सापळा पिकांच्या नियोजनातून किडींचे व्यवस्थापन...कसे ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

शासन व शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास सजीवसृष्टीची संभाव्य हानी टाळता येईल व पिक संरक्षणाचा खर्च कमी करता येईल. याकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या इतर अनेक घटकांपैकी सापळा पिक एक या महत्वाच्या घटकाचे लागवडीचे नियोजन करणे हिताचे राहील.

नांदेड : निसर्गातील ९८ टक्के किडींचे नियंत्रण नैसर्गिकरीत्या होत असून फक्त दोन टक्के किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात अविवेकी वापर होत आहे. शत्रू किडींना मारण्याच्या प्रयत्नात मित्र किडीही मारल्या गेल्या. त्यामुळे शत्रू किडींची संख्या वाढतच गेली आणि मित्र किडींची संख्या कमी झाली. आज आपल्या देशातील ५५ ते ६० टक्के शेती उत्पादनामध्ये रासायनिक कीटक नाशकांचा अंश ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा जास्त आहे. पाणी आणि दुधामध्ये रसायनांचा अंश प्रमाणापेक्षा जास्त आहे. याचा परिणाम मतिमंदता, अपंगत्व यासारखे गुंतागुंतीचे अनेक व्यंग आणि रोग मानवी शरीत्रात आढळून येत आहेत. 

एकात्मिक कीड व्यवस्थापनाची गरज
अशा बिकट समयी सावधान होऊन शासन व शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास सजीवसृष्टीची संभाव्य हानी टाळता येईल व पिक संरक्षणाचा खर्च कमी करता येईल. याकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या इतर अनेक घटकांपैकी सापळा पिक एक या महत्वाच्या घटकाचे लागवडीचे नियोजन करणे हिताचे राहील. मुख्य पिकांचे किडींपासून नुकसान कमी करण्यासाठी किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पिक मुख्य पिकासोबत लावल्यास त्या पिकाकडे कीड आकर्षित होते आणि पर्यायाने मुख्य पिकाचे संरक्षण होते. अश पिकांना ‘सापळा पिके’ म्हणतात.

हेही वाचा....सर्वच तालुक्यात दमदार पाऊस

सापळा पिक वापरण्याची तत्वे : 
सापळा पिक किडींना आकर्षित करणारे असावे. तसेच ते उपयोगाचे असावे जेणेकरून त्या पासून शेतकऱ्यास अधिकचे उत्पन्न मिळेल. मुख्य पिकाच्या शेतातील मुदतीच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे. सापळा पिकावरील किडींची अंडीपुंज व किडी वेळोवेळी गोळा करून नष्ट करावी. अन्यथा सापळा पिक किडींचे नंदनवन होईल व त्यामुळे मुख्य पिकाचे नुकसान होऊ शकते. सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे किंवा कीटक नाशकाची फवारणी करावी.

हेही वाचलेच पाहिजे....शेतकरी कुटूंबांसाठी दिलासा.....कसा तो वाचा

महत्वाच्या पिकातील सापळा पिके 
कापूस :
प्रत्येक दहा कपाशीच्या ओळीनंतर दोन ओळी मका किंवा चवळीची पेरणी करावी. त्यामुळे नैसर्गिक मित्र कीटकांचे संवर्धन व अभिवृद्धी होण्यास मदत होते. चवळीवर मावा मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यावर क्रायसोपा, लेडीबर्ड बीटल, सिरफिड माशी इ. मित्र किडींची वाढ होते व मावा या शत्रू किडींची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत होते.
कपाशीमध्ये उडीद, मुग, यांसारखी आंतरपिके घेतल्यास मित्र कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते. तसेच कपाशीमध्ये दहाव्या किंवा अकराव्या ओळीत भगर पिकाची एक ओळ टाकल्यास भगरीच्या कंसातील दाणे वेचून खाण्यासाठी चिमणी सारखे पक्षी आकर्षित होतात व त्या सोबत ते पिकावरील उंट अळ्या, हेलीकोवर्पा, स्पोडोप्टेरा, इ. किडींच्या अळ्यांना आवडीने वेचून खातात त्यामुळे किडींचे नियंत्रण होण्यास मदत होते.

कपाशी भोवती झेंडूची ओळ लावावी
कपाशी भोवती आफ्रिकन किंवा फ्रेंच झेंडू या सापळा पिकाची एक बॉर्डर ओळ लावावी. झेंडूच्या पिवळ्या फुलांकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षित होऊन त्यावर अंडी घालतो. तसेच झेंडूच्या मुळांमध्ये ‘अल्फा टर्निथल’ हे रसायन स्त्रवते त्यामुळे सुत्रकृमींचे नियंत्रण होण्यास मदत होते. कपाशीभोवती एक ओळ एरंडी या सापळा पिकाची बॉर्डर ओळ घ्यावी. उंट अळ्या व स्पोडोप्टेराचा पतंग एरंडीच्या पानांवर अंडी घालतो, अशी अंडीपुंज व अळ्या वेचून नष्ट केल्यास मुख्य पिकाचे संरक्षण होते.

सोयाबीन :
सोयाबीन पिकाभोवती एरंडी आणि सुर्यफुल या सापळा पिकांची एक-एक बॉर्डर ओळ लावावी. स्पोडोप्टेराचा मादी पतंग एरंडीच्या पानांवर समूहाने अंडी घालतो. अशी अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त पाने अळीसहित नष्ट करावीत किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी. सूर्यफुलाची पिवळी फुले आणि रुंद पाने हेलीकोवर्पा, उंट अळ्या, स्पोडोप्टेरा आणि केसाळ अळीच्या मादी पतंगांना अंडी घालण्यास आकर्षित करतात. असी पाने अंडी व अळ्यासहित नष्ट करावीत.

तूर :
घाटेअळी, सुत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तूर अधिक ज्वारी ४:२ किंवा ३:३ या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. तूर सलग पेरणीसाठी तुरीच्या बियाण्यात १% ज्वारी किंवा बाजरी किंवा सूर्यफुलाचे बी मिसळून पेरणी करावी. अर्थात तुरीचे बियाणे १० किलो असल्यास त्यात १०० ग्रॅम ज्वारी किंवा बाजरी किंवा सूर्यफुलाचे बी मिसळावे त्यामुळे मित्र पक्षी आकर्षित होऊन शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करतील.

भुईमुग :
भुईमुग पिकाच्या बॉर्डर ओळीने सूर्यफुलाची सापळा पिक म्हणून लागवड केल्यास हेलीकोवर्पा, स्पोडोप्टेरा आणि केसाळ अळीच्या मादा पतंग पिवळ्या रंगाच्या फुलाकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. अशा फुलांवरील अंडीपुंज आणि अळ्या वेचून नष्ट कराव्यात.

टोमॅटो :
टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी आणि सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी टोमॅटो पिकाभोवती झेंडूची एक ओळ सापळा पिक म्हणून लावावी.

फळपिके: 
फळ पिकातील सुत्रकृमींच्या नियंत्रणासाठी झेंडू सारखे मिश्रपिके घ्यावीत. झेंडूच्या मुळांमध्ये ‘अल्फा टर्निथल’ हे रसायन स्त्रवते त्यामुळे सुत्रकृमींचे नियंत्रण होण्यास मदत होते व फुलांपासून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळते.

सापळा पिकाचे फायदे :
कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
मित्र कीटकांचे संवर्धन होते.
पिकाचे उत्पादन व प्रत सुधारते.
पिक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
पर्यावरणाचे संवर्धन होते.
सापळा पिकापासून अधिकचे उत्पन्न मिळते.

- डॉ. कृष्णा अंभुरे
विषय विशेषज्ञ - पिक संरक्षण 
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड 
  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insect management from trap crop planning ... read on