डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर शंका घेणे चुकीचेच ः अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख

शिवचरण वावळे
Monday, 19 October 2020

शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या शंकर कुंभार या रुग्णाची प्रकृती खुपच नाजूक होती. त्यास अनेक प्रकारचे गंभीर आजार होते. अशा स्थितीत देखील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. परंतु एकाच वेळी अनेक आजार असल्यामुळे रुग्ण दगावला

नांदेड - दोनदिवसांपूर्वी देगलूर येथील शंकर कुंभार नावाच्या एका व्यक्तीवर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच या रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप केला. यास अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी मात्र रुग्णाच्या नातेवाईकांच्या भावना समजुन घेऊ, पण त्यासाठी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर शंका घेणे चुकीचे असल्याचे सांगितले.

कोरोनाच्या काळात सर्वच विभागातील डॉक्टर मनापासून रुग्णसेवा करत आहेत. शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या शंकर कुंभार या रुग्णाची प्रकृती खुपच नाजूक होती. त्यास अनेक प्रकारचे गंभीर आजार होते. अशा स्थितीत देखील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. परंतु एकाच वेळी अनेक आजार असल्यामुळे रुग्ण दगावला असण्याची शक्यता अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केली.  

हेही वाचा- राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही असे राज्यपालांचे वर्तन- विजय वडेट्टीवार ​

डॉक्टरांचा दोष असल्याचे वाटत नाही.

रुग्णालयात दोन हजार लिटरचे लिक्वीड ॲक्सीजन टॅंक आहे. त्याशिवाय साडेतीनशे गॅस सिलेंटर देखील भरुन तयार आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास गॅस कमी पडणे किंवा न मिळणे हे आरोप का? आणि कोणत्या भावनेतून केलेत? याबद्दल सांगता येणार नाही. नातेवाईकांकडून डॉक्टरांवर आरोप केल्यानंतर मी स्वतः सर्जरी विभागातील डॉक्टर व तिथली परिस्थिती याबद्दल माहिती घेतली असता,  यात डॉक्टरांचा कुठलाही दोष असल्याचे वाटत नाही. असे म्हणत अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी डॉक्टरांची बाजु मांडत डॉक्टरांच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवर देखील समाधान व्यक्त केले. 

 हेही वाचले पाहिजे- दुष्काळ मदत पाहणीला आमदाराच्या नाराजीची फोडणी ​

आरोग्य यंत्रणेनी गाफील राहता कामा नये

अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी घेतलेल्या डॉक्टरांच्या बाजुमुळे मागील सहा महिण्यापासून कोविड काळात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना निश्‍चितच बळ मिळेल यात तिळमात्र शंका नाही. परंतु रुग्णालयात सर्वच काही सुरळीत आहे. अशा अविर्भावात अधिष्ठाता यांनी राहु नये असे अनेकांना वाटते. सध्या शासकीय रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या फारशी नसली, तरी भविष्यात कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो; त्यासाठी यंत्रणेनी सज्ज असायला हवे. मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आलेख वाढत होता. तो आता आटोक्यात आला आहे. असे असले तरी आरोग्य यंत्रणेनी गाफील राहता कामा नये.  अन्यथा पुन्हा कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is wrong to doubt the workings of a doctor The incumbent Dr. Sudhir Deshmukh Nanded News