दुष्काळ मदत पाहणीला आमदाराच्या नाराजीची फोडणी

शिवचरण वावळे
Sunday, 18 October 2020

एखादा मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्यास त्यापूर्वी संबंधित मंत्र्याचा दौरा कार्यक्रम आखला जातो. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना या दौऱ्याबद्दल इ-मेल आणि फोन करुन संबंधित दौऱ्याची माहिती दिली जाते. मात्र, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे रविवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार हे निश्‍चित असताना देखील आमदार बालाजी कल्याणकर यांना साधा कुणी फोन केला नसल्याचे समजते.

नांदेड - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार रविवारी (ता. १८) नांदेड दौऱ्यावर येणार असल्याचा शासकीय दौरा शनिवारीच प्रशासनाकडे आला. मात्र, या दौऱ्याचा निरोप नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देण्यात आला नव्हता. त्यांना या दौऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता का? असा राजकीय वर्तुळात प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. खुद्द आमदार बालाजी कल्याणकर यांना माहिती दिली नसल्याने त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

नियमाने एखादा मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्यास त्यापूर्वी संबंधित मंत्र्याचा दौरा कार्यक्रम आखला जातो. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना या दौऱ्याबद्दल इ-मेल आणि फोन करुन संबंधित दौऱ्याची माहिती दिली जाते. मात्र, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे रविवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार हे निश्‍चित असताना देखील आमदार बालाजी कल्याणकर यांना साधा कुणी फोन केला नसल्याचे समजते. आमदार कल्याणकर यांना दौऱ्याबद्दल बातम्यांमधून माहिती मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा- सोशल मिडीयाच्या ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडची दखल ​

जिल्ह्यात कॉँग्रेसचे वर्चस्‍व 

जिल्ह्यात सध्या कॉँग्रेसचे पाच व भारतीय जनता पार्टीचे चार, शिवसेनेचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात कॉँग्रेसचे वर्चस्‍व आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या आमदारास मंत्र्यांच्या दौऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. तीन पक्षाचे सरकार असल्याने राज्यात अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी जुळवून घेताना नेत्यांना देखील चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. 

हेही वाचले पाहिजे- नासाडी टाळण्यासाठी शाळांमध्ये खिचडीऐवजी शिधा द्यावा ​

अधिकाऱ्यांनी हात झटकले

याविषयी आमदार बालाजी कल्याणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील मंत्री येणार असल्याचे कुठलेही निमंत्रण किंवा फोन देखील आला नसल्याचे सांगितले. माध्यमातील बातम्या बघून मंत्री विजय वडेट्टीवार आल्याचे समजल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार बालाजी कल्याणकर यांना संबंधित यंत्रणेने कल्याणकर यांना माहिती दिली होती का, याबद्दल संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता श्री. वडेट्टीवार यांचा शनिवारी उशिराने दौरा आला. दरम्यान, आमदार बालाजी कल्याणकर यांना फोन करुन माहिती देण्याच्या प्रयत्न केला असता त्यांचा फोन लागत नसल्याचे सांगुन हात झटकले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA's displeasure over drought relief inspection Nanded News