दमरेच्या नांदेड विभागातूुन जानेवारी महिन्यात 33 किसान रेल्वे धावल्या; 6.58 कोटीचे महसुल

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 3 February 2021

6. 58 कोटी रुपयांचे उत्पन्न 13, 658 टन कांद्याची वाहतूक, किसान रेल्वेने मालवाहतूक केल्यास वाहतूक दरात 50 % सूट, शेतकरी आणि व्यापारी यांना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड : कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करुन देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरु केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्सप्रेस ता. 5 जानेवारीला नगरसोल येथून सोडण्यात आली. नांदेड रेल्वे विभागातील नगरसोल येथून 31 जानेवारीपर्यंत 33 किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. या 33 किसान रेल्वे मधून 13 हजार 658 टन (तेरा हजार सहाशे अठावन्न टन )  कांदा पाठविण्यात आला.  

या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला आदी  ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत चालविण्यात आलेल्या 33 किसान रेल्वेमधून नांदेड रेल्वे विभागास 6. 58 कोटी (सहा कोटी अठावन्न लाख रुपये ) चा महसूल मिळाला आहे. नांदेड विभागातून या वर्षी मार्च महिन्याअखेरीस आणखी 75 किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ठ आहे. ता. दोन फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणाकरिता आणखी 105 किसान रेल्वेची मागणी नोंदविण्यात आली आहे. 

हेही वाचा - नांदेड तालुक्यात ३७ महिलांना मिळणार सरपंचपदाचा मान

किसान रेल्वेचे वैशिठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात, साधारण 50 किलोमीटर प्रती घंटा या वेगाने धावतात, यामुळे शेती माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स- टॉप टू टोटल" च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.  त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वे ला वाहतुकीसाठी 5० टक्के दर सवलत देण्यात आली आहे. 

विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातुन यशस्वीपणे किसान रेल सुरु करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला.  श्री सिंघ यांनी शेतकरी आणि व्यापारी यांना आवाहन केले आहे की, किसान विशेष रेल्वेकरिता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरुन आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच नांदेड विभागातून मालवाहतूक वाढवण्यात  हातभार लावावा.  

येथे क्लिक करानांदेड : कोट्यावधी रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचा जामीनअर्ज नाकारला

किसान रेल्वे व्यतरिक्त नांदेड विभागाने या वर्षी माल वाहतुकीमध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन करुन वसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकावरुन विविध ठिकाणी 12 साखरेचे रेक पाठविले. तसेच आदिलाबाद येथून पाच मक्याचे रेक पाठविले. हिंगीली रेल्वे स्थानकावरुन तीन वर्षाच्या अंतरानंतर सरकीचे तीन रेक पाठविण्यात आले तसेच मालटेकडी- नांदेड येथून गुळाचे पाच रेक पाठविण्यात आले आहेत. 

इंजिनीरिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे पटरीच्या देखरीखीकरिता विशेष मेहनत घेतल्यामुळे मालगाड्यांच्या गतीमध्ये खूप सुधारणा झाली आहे. नांदेड विभागातील मालगाड्यांची गती 28 किलोमीटर प्रती घंटा होती यावर्षी ती वाढून 45 किलोमीटर प्रती घंटा झाली आहे. याचा परिणाम मालवाहतूक वाढण्यावर  झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In January, 33 Kisan Railways ran a revenue of Rs 6.58 crore from Nanded Railway Department nanded rail news