नांदेड दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी; माजी मंत्री अनील बोंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anil bonde
नांदेड दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी; माजी मंत्री अनील बोंडे

नांदेड दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी; माजी मंत्री अनील बोंडे

नांदेड : त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान नांदेडात दंगल झाली. या दंगलीची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने गुरुवारी (ता. २२) धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बोंडे म्हणाले की, रजा अकादमीच्या वतीने ता. १२ नोव्हेंबर रोजी राज्यात बंदचे आवाहन करण्यात येऊन मोर्चे काढण्यात आले. त्यावेळी अमरावती, मालेगाव व नांदेड येथे झालेल्या दंगलीमध्ये अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली. पोलिस आणि निरपराध नागरिकांनाही मारहाण करण्यात आली. वारंवार अशा हिंसक घटना घडत आहेत. यास रजा अकादमी जबाबदार आहे. मात्र, शासनाकडून कारवाई केली जात नाही.

दोषींवर कडक कारवाई करावी. प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांना अटक करावी. वाळू माफिया, गुटखा किंग, लाॅटरी किंग, मटका किंग यांच्यावर कारवाई करावी. शेतकऱ्यांची वीज खंडित करू नये. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी केली. तर या दंगलीच्या विरोधात भाजपाच्या वतीने राज्यात धरणे आंदोलन करण्यात येत आहे, असेही माजी मंत्री अनील बोंडे यांनी यावेळी सांगितले.

नांदेडच्या दंगलीतील आरोपींना राजकीय मंडळी अटक करू देत नाहीत. या आरोपींना अटक करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा खासदार चिखलीकर यांनी दिला. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात आमदार राम पाटील रातोळीकर, तुषार राठोड, प्रदेश सदस्य डॉ. संतुक हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्या प्रणिता चिखलीकर, प्रविण पाटील चिखलीकर, चैतन्य देशमुख, महानगराध्यक्ष प्रवीण साले, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, दिलिपसिंघ सोडी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

loading image
go to top