जाणून घ्या: सीमावर्ती देगलूर परिसरात मराठी माणसं बोलतात इतक्या भाषा

file photo
file photo

नांदेड : देगलूर नांदेड जिल्ह्यातील एक सीमेवरचा तालुका असून याच्या पूर्वेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटकाची सीमा आहे. या भागावर इ. स. १७२७ पासून ते १९४८ पर्यंत हैद्राबादच्या निजामाची सत्ता होती. निजाम काळात येथील राजभाषा आणि शिक्षणाचे माध्यम उर्दू होते. निजामी राजवटीचा प्रभाव आणि तीन प्रांतांच्या सीमा यामुळे मराठी, कन्नड, तेलगू आणि हैद्राबादी उर्दू भाषेचा मिलाफ येथे आढळतो. या परिसरातील बल्लुर, आलूर, तमलूर, कोटेकल्लुर, सुंडगी, कुरुडगी, कुन्मारपळी, मरतोळी, मरपळ्ळी अशी ग्रामनामे आणि मल्लप्पा, ईरप्पा, लालप्पा, नरसन्ना, सायन्ना, मलशेट्टी, पोशेट्टी, संगम्मा, लिंगम्मा, राचव्वा, घाळव्वा अशा पारंपरिक व्यक्तीनामातून तेलगू, कन्नड भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव अधोरेखित होतो.

देगलूर परिसराचा दिशानिर्देश देखील वैविध्यदर्शकच आहे. देगलूरच्या पूर्वदिशेस उताराचा भाग असल्यामुळे खाल्लाकडे, पश्चिमेस डोंगराळ भाग असल्यामुळे वरलाकडे, दक्षिणेस बिदर जिल्हा असल्यामुळे बेदराकडे आणि उत्तरदिशेस नांदेडची गोदावरी असल्यामुळे गंगेकडे असा निर्देश करतात. प्रमाण मराठी भाषेच्या व्याकरणातील लिंग, वचन, विभक्तीप्रत्यय, प्रयोगविचार यासंबंधीचे नियम येथील भाषेत फारसे आढळत नाहीत. या परिसरातील तेलगू भाषिक स्त्री मराठी बोलत असताना येतो, जातो, खातो, पितो असा क्रियापदाचा वापर करते. कन्नड भाषेच्या प्रभावातून पुरुषासही जातीस, येतीस, जेवतीस, झोपतीस असे बोलतात. तेलगूच्या प्रभावातून जातूस, येतूस, खातूस, असेही बोलले जाते. नकार दर्शवण्यासाठी ना चा वापर
होतो. जाईना, येईना, बसना, उठना, झोपना असे बोलले जाते. एखादी वस्तू पोहोचत नसेल तर मला ते अंबडना चाल्लय असे म्हणतात.

सर्रासपणे तेलगू, कन्नड आणि उर्दू शब्दांचा वापर होतो

दैनंदिन वापरातील अनेक वस्तुंचा निर्देश करत असताना येथे सर्रासपणे तेलगू, कन्नड आणि उर्दू शब्दांचा वापर होतो, त्यात कुणालाही फारसे नवल वाटत नाही. अडकित्ता हा मुळातला कन्नड शब्द असला तरी तेलगूच्या प्रभावातून त्याला येथे अडकोत म्हणतात. पोह्यांसाठी अडकूल हा तेलगू शब्द वापरतात. मफलरसाठी गुलबंद हा हैदराबादी उर्दू शब्द वापरला जातो. या भागातील कन्नड आणि तेलगू भाषिक लोक लहान मुलाच्या चड्डीस नयकल म्हणतात. बोंदरी (कापूस भरलेले मोठे पोते), बुट्टी (वेळूची टोपली), सोल (जाड दोरी), बोट्टु (टिळा), संदूक (पेटी), परडा (गोठा), ताकडी (तराजू), गुडची (खोपी), कडची (उलतान), डोंगा (लोडणं), बंक (ढालज), हडपी (वळकट्टी), चेंबु (पेला) इत्यादी वस्तुदर्शक अपरिचित शब्द येथे रुढ आहेत. विशेषणांचा येथे जो वापर होतो, तोही वैविध्यपूर्ण आहे. कोंचम (त्रोटक). लपूट (खोटारडा), चकोट, नादर (चांगले), उमाट ( उंचवटा), बदकल ( खोलगट), सपकल ( उतार), मोंड (बोथट), घुरदाळा ( धिंगाणा) अशी विशेषत्व दर्शक तेलगू आणि कन्नड शब्द येथील मराठीत पदोपदी आढळतात. त्याच प्रमाणे बयाना, बयनामा, जायदास्त, तसबा, तरकारी, गाफील, फिकीर, तकलीफ, कैपत, हुजीर अशा हैदराबादी उर्दू शब्दांचा वापर येथील लोकव्यवहारात सर्रासपणे होतो.

देगलूर परिसरात रुढ असलेले अनेक वाक्प्रचार कोश वाड्मयात अपवादानेच सापडतात.

संदिग्ध गुंतागुंतीच्या व्यवहारासाठी येथे गोल्लाबेपार हा वाक्प्रचार रुढ आहे. या परिसरात गोल्ला या जातीची भाषा तेलगू असल्यामुळे त्यांचे व्यवहार इतरांना फारसे कळत नाहीत म्हणून संदिग्ध व्यवहारासाठी ;गोल्लाबेपार हा वाक्प्रचार रुढ झाला. येथील लिंगायतांच्या लग्नात नात्याने मेव्हणा असलेल्या पुरुषास साडी नेसवून नाचत मंदिरास जाण्याची एक विधि आहे. त्यावरून ईरहलगी काढणे (फजिती करणे) हा वाक्प्रचार रुढ झाला आहे. गोंदरणे (कुरकुरणे) अरबाळणे, दंडाळणे (घाबरणे) अक्काटूका बघणे (कानोसा घेणे), गुदेलं लाड ( फाजील लाड), कॅरी ठोकणे ( आरोळी ठोकणे), गोड्डु गाऱ्हाणी (वांझ गाऱ्हाणी) अशा या वाक्प्रचारांवर शेजारील प्रांताचा प्रभाव जाणवतो. येथील मराठी भाषेत कन्नड, तेलगू आणि उर्दू भाषेतील काही म्हणी जशास तशा वापरल्या जातात; तर काही म्हणी रुपांतरित होऊन मराठी भाषेत स्थिरावल्या आहेत. मराठीवर जसा तेलगू आणि कन्नडचा प्रभाव आहे, तसेच या सीमा परिसरातील तेलगू आणि कन्नडवर मराठीचा प्रभाव दिसतो. एकंदर तीन प्रांताच्या भाषा आणि संस्कृतीच्या मिलाफाचा परिपाक म्हणजे देगलूर परिसराची वैविध्यपूर्ण भाषा आहे. भाषा अभ्यासाच्या अनेक संधी या परिसरात आहेत. त्या दृष्टीने संशोधन होणे गरजेचे ठरते.

शब्दांकन-डॉ. रवींद्र बेम्बरे, प्रमुख, मराठी विभाग,
कै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com