ऐकावे ते नवलच : देगलुरच्या या गावात दाम्पत्य सात वार्डातून निवडणूक रिंगणात  

अनिल कदम
Monday, 11 January 2021

शासनाकडून गावच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी येऊनही विकासाची गंगा मात्र शहापुरात वाहीलीच नाही.

देगलूर ( जिल्हा नांदेड ) : गेल्या चाळीस वर्षापासून त्या- त्या घराण्यात गावातील ग्रामपंचायतीच्या सत्तेची सूत्रे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ना पिण्याचे पाणी, ना चांगले शिक्षण, ना चांगले आरोग्य. मूलभूत सुविधांसाठी गावकऱ्यांना आजही संघर्ष करावा लागतो आहे.

शासनाकडून गावच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी येऊनही विकासाची गंगा मात्र शहापुरात वाहीलीच नाही. गावकुसातील तरुण बेरोजगारांनी दिलेली आर्त हाक माझ्या कानी येताच माझे मनही अस्वस्थ झाले, त्यामुळे मला ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घ्यावी लागली अशी प्रतिक्रिया शहापूर ग्रामपंचायतमधील पाचही प्रभागातून स्वतः चे दोन व पत्नीचे पाच, असे एकूण सात अर्ज दाखल करणारे अपक्ष उमेदवार जनार्धन रामा कांबळे यांनी दिली. 
    
स्वतः जनार्दन कांबळे पदवीधर असून पत्नी पूजा कांबळे याही उच्चशिक्षित आहेत. शहापूर ही तालुक्यात सर्वात मोठी म्हणजेच पंधरा सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत असून येथे चार हजार आठशे मतदार आहेत. कांबळे दाम्पत्य स्वतः राखीव प्रवर्गातील असली तरी त्यांनी प्रभाग एक व दोनमध्ये सर्वसाधारण गटातून मतदारांसमोर जात आहेत. प्रभाग १, २, ३, ४, ५ हाय या पाचही प्रभागातून पूजा कांबळे निवडणुकीत उतरल्या असून पती जनार्धन कांबळे हे प्रभाग चार, पाचमध्ये स्वतः चे नशीब अजमावित आहेत. 

हेही वाचाGram Panchayat Election : मी सरपंच होणार, गावचा विकास करण्याच्या ठाम निर्धाराने नारी शक्ती प्रचारात

शहापूर हे गाव तालुक्यात सधन

शहापूर हे गाव तालुक्यात सधन समजले जाते ते तेलंगणा व आंध्र लगतच्या टोकावर असून येथील शेती उत्तम दर्जाची असून शेतीला सिंचनाची मोठी सोय असल्याने येथील शेतकरी जिरेनियम व कोथिंबीर यासारखे नाविन्यपूर्ण पिके घेऊन स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेगळी वाट शोधलेली आहे. गावालगतच असलेले लेंडी व मन्याड नदीचे पात्र हे लाल रेती साठी कोठार समजले जाते. त्यामुळे ही या ग्रामपंचायतीला फार मोठे महत्त्व आलेले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कनंकटे यांच्या अन्त्योदय पॅनलसमोर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना युतीचे ग्रामविकास पॅनलमध्येच चुरशीची लढत होत असताना अपक्ष कांबळे दाम्पत्याने एकेरी लढत देण्याचा निर्णय घेतल्याने पंचक्रोशीत या राजकीय पटलावर याची  जोरदार चर्चा होत आहे.

ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीला वेगळे महत्त्व आले

राजकीय दृष्ट्या शहापूर हे गाव महत्वाचे असून येथे भाजप तालुका अध्यक्ष यांची कर्मभूमी ही हीच असून पंचायत समितीचे उपसभापती चिंतलवार जगदीश येथील रहिवासी आहेत. ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक राहिलेले जि. प. चे माजी सदस्य दिवंगत सायलू यालावार यांनी श्री चव्हाण यांच्या सहकार्यातून जिनिंग पेसिंगच्या व साखर कारखान्याच्या रुपाने अनेकांना रोजगारही मिळवून दिला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीला वेगळे महत्त्व आले आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Listen to Navalach: In this village of Deglur, a couple is contesting from seven wards nanded news