esakal | लॉकडाउन : गृहकलहामध्ये वाढ, घरातून निघून आलेल्या महिलेलेचे समुपदेशन

बोलून बातमी शोधा

file photo

कौटुंबिक वादातून चिमुकल्यांसह घराबाहेर पडलेल्या महिलेचे व तिच्या पतीचे समुपदेशन करून नांदेड पोलिसांनी पाठवले घरी.

लॉकडाउन : गृहकलहामध्ये वाढ, घरातून निघून आलेल्या महिलेलेचे समुपदेशन
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव सध्या संपूर्ण जगभरात लॉकडाउन सुरू आहे. भारतातदेखील आता तिसरा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बहुंताश लोक आपल्या घरी आहेत. आपल्या परिवारसोबत वेळ घालवत आहेत. मात्र यामुळे जगभरातून गृहकलहाच्या घटना वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. काही अभ्यासकांच्या मते लॉकडाउनमध्ये गृहकलहाच्या व वादाच्या घटना वाढत आहेत. खरे तर लॉकडाउन काळात संपूर्ण कुटुंबात एकत्रितपणे राहून वेळ घालवण्याची संधी आहे. मात्र हे होताना दिसत नाही. 

असाच एक प्रकार शहराच्या दत्तनगरातील एक विवाहित महिलेनी सासु व पतीच्या त्रासाला कंटाळून आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन घर सोडले. शुक्रवारी (ता. एक) रात्री नऊ वाजण्याच्या आसपास ही महिला अण्णाभाऊ साठे चौकात आपल्या बाळासह पोहोचली. आपल्या पतीशी ती चलभाष यंत्रणेवरुन बोलत होती. ही बाब बंदोबस्तावर असलेले वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आली. सदर महिलेला जवळ बोलावून तिची विचारपूस केली. 

हेही वाचा Video : बेभान ! नांदेडकर कधी येणार भानावर ?

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे नोकरी 

यावेळी आपली सासू आपल्यावर चोरीचा आळ घालते, घर सोडून निघून जा म्हणून वाद घालत असल्याने आणि पती आपली कोणतीही बाजू घेण्यास तयार नसल्यामुळे मी माझ्या चिमुकल्याला घेऊन घराबाहेर पडले. मी व माझा पती औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे वास्तव्यास राहतो. सिल्लोड येथे खाजगी जॉब आहे. लॉकडाउनपूर्वी आम्ही नांदेडला सासरी आलो होतो. त्यानंतर लॉकडाउनमुळे आम्ही इथेच अडकून पडलो. गेल्या काही दिवसापासून सासुबाई सोबत आपले पटत नाही. त्यात आज कडाक्याचे भांडण झाले. 

समुपदेशनानंतर पीडीत महिला घरी परतली

सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग आणि सुरू असलेला लॉकडाउन, रात्रीची वेळ या सर्व बाबी पाहता पोलीसांनी त्या महिलेचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. दामिनी पथकालाही बोलावण्यात आले होते. त्याच परिस्थितीत सदरील महिलेच्या पतीला फोन करून अण्णाभाऊ साठे चौकात बोलावण्यात आले. सदरील महिलेचा पती अण्णाभाऊ साठे चौकात दाखल झाला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घुगे आणि तिथे असलेल्या अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सदरील जोडप्याचे रात्री साडेनऊ वाजता समुपदेशन केले. रात्रीच्या वेळी एकटी फिरणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत असणाऱ्या परिस्थिती बाबत, आणि महिलांवरील झालेल्या अत्याचाराची माहिती तिला पटवून देण्यात आली. 

येथे क्लिक करा - प्रशासनाला ‘त्या’ २३ चालकांच्या अहवालाची प्रतिक्षा

लॉकडाउन असल्याने घराबाहेर पडणे कायद्याने गुन्हा

अनेक घरांमध्ये असे कौटुंबिक वाद होत असतात. आपण ही परिस्थिती समजून घेण्याची वेळ आहे. घर सोडून हा प्रश्न मार्गी लागणार नाही तर घरातील लोकांना समजून घेऊन आपल्याला संसार करावा लागेल असे समुपदेशन श्री. कदम यांनी केले. लॉकडाउन सुरू असल्याने घराबाहेर पडणे कायद्याने गुन्हा आहे. शिवाय जिल्हा प्रशासन आता बाहेरगावी अडकलेल्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या लोकांसाठी काही उपाययोजना करणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या संपर्कात राहून आपण आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यानंतर पतीचे समुपदेशन केल्यानंतर ती महिला आपल्या मुलांसह घरी परतली.