नांदेडात लॉकडाउनचा बळी, विष पिऊन फायनान्सरची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
Sunday, 11 October 2020

हातचा व्यवसाय ठप्प झाल्याने विवंचनेत वावरणाऱ्या एका फायनान्स व्यापाऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शहराच्या चौफाळा परिसरातील विणकर कॉलनीमध्ये शनिवारी (ता. १०) दुपारी साडेबारा वाजता घडली. 

नांदेड : कोरोनाच्या संसर्गाने अख्ख्या जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या आजारापुढे जगातील महासत्ता हतबल ठरल्या आहेत. लाखोंचा बळी घेणाऱ्या कोरोनाने संबंध मानव जातीवर मोठे संकट उभे केले आहे. मागील सात महिण्यापासून या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशासह राज्यात व जिल्ह्यात लॉकडाउन लावण्यात आले. लॉकडाउनचा फटका सर्वांनाच बसला. हातावरचे पोट असणारे तर यात होरपळून निघाले. अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने बेरोजगार झाले. खासगी व्यावसायीक यात भरडल्या गेले. हातचा व्यवसाय ठप्प झाल्याने विवंचनेत वावरणाऱ्या एका फायनान्स व्यापाऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शहराच्या चौफाळा परिसरातील विणकर कॉलनीमध्ये शनिवारी (ता. १०) दुपारी साडेबारा वाजता घडली. 

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सरकारने मार्चपासून लॉकडाउन लावले आहे. एकापाठोपाठ एक- एक टप्पा लॉकडाउन वाढत गेला. कोरोनाचा संसर्ग काही कमी झाला नाही. मात्र अनेकांच्या हातचा रोजगार बंद पडला. अनेक खासगी कंपन्यानी आपल्या कामगारांना घरी पाठविले. बेरोजगार झालेल्या कामगारांनी आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी लहान- मोठा उद्योग सुरु केला. परंतु लॉकडाउनचा फटका सहन करत काहीजण तग धरुन आहेत. हाताला मिळेल ते काम करण्यासाठी प्रत्येकजण मजबुर झाला आहे. स्वतंत्र व्यवसाय करणारे डबघाईस आले. अजूनही व्यवसायाला चांगले दिवस आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक, दुकानदार आणि नागरिक संकटात अडकला आहे. 

हेही वाचा -  Good News : पीक नुकसानीची रक्कम एकत्रच मिळणार- डॉ.विपीन -

लॉकडाउनचा बळी

लॉकडाऊनमुळे हातावर असलेला फायनान्सचा व्यवसाय ठप्प झाल्यानंतर आता कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा या विवंचनेत असणाऱ्या एकनाथ ओमप्रकाश गरुडकर ( वय ३९) रा. विणकर कॉलनी, नांदेड याने शनिवारी (ता. १०) दुपारी आपल्या घरी विष प्राशन केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनचा बळी ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती तुकाराम ओमप्रकाश गरुडकर यांच्या माहितीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. पवार करत आहेत. 

येते क्लिक करा - हैद्राबाद कुळ कायद्यानूसार एनटीसी मिल रहिवाशांचे कुळ नियमित करा

सेंट्रींगची प्लेट डोक्यावर पडल्याने एकाचा मृत्यू

शहराच्या भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या एका बांधकामावर शेख इम्रान शेख सरवर (वय १८) हा कामाला होता. शनिवारी (ता. १०) दुपारी तो लघुशंकेसाठी जात असताना त्याच्या डोक्यावर सेंट्रींगची प्लेट पडली. यात त्याचा मृत्यू झाला. शेख हानिफ शेख सरवर यांच्या माहितीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. सिरसाट करत आहे.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown victim in Nanded, financier commits suicide by drinking poison nanded news