अर्धापूर : ग्रामपंचायतीला मार्च एंड पावला

अर्धापुरला दहा दिवसांत विकास कामे करण्याचे आव्हान
fund
fundEsakal

अर्धापूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा शिल्लक राहीलेला निधी भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर, भोकर, मुदखेड या तीन तालुक्यातील ग्रामपंचायतीला वर्ग केला आहे. अर्धापूर तालुक्यातील सुमारे ३९ ग्रामपंचायतीला साडे पाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून सिसी रस्ता व पेव्हर ब्लॉकचे काम करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. या बाबतचे शासनाने एक परिपत्रक काढून गाव निहाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही कामे दहा दिवसात करावी लागणार आहेत. त्यामुळे कामे पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली आहे. या गडबडीत कामांच्या दर्जाला मात्र तिलांजली देण्यात येत आहे अशी चर्चा गावा गावात सुरू झाली आहे.

दहा दिवसांत प्रशासकीय, तांत्रिक मान्यता घेणे, काम करणे, कामांचे मोजमाप करणे, आराखडा मंजूर करणे व अंतिम अहवाल सादर करुन देयके मंजूर करून घेणे यांसह विविध प्रशासकीय कामे करावी लागणार असल्याने सरपंच उपसरपंच, ग्रामसेवकांना बोलण्यासाठी वेळ मिळत नाही.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भोकर या विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, भोकर, मुदखेड या तीन तालुक्यातील ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी दहा दिवसांत वापरून कामे करण्याचे आव्हान पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय यांच्या समोर आहे. या निधीतून सीसीरोड, पेव्हर ब्लॉकचे काम करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. ही कामे तातडीने करावी लागणार आहेत.

रस्त्यासाठी सिमेंट, वाळू, गिट्टी एकत्र केले की झाला रस्ता असे चित्र पाहायला मिळत आहे. हे काम करताना पाणी, दबई आवश्यक त्या ठिकाणी लोखंडाचा वापर करणे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. अशा प्रतिक्रिया गावातील नागरिकांत आहेत. तर पेव्हर ब्लॉकची मागणी वाढल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. मिळेल ते पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत.

निधीचा विनियोग चांगला व्हावा

येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी सरपंच आपल्या बाजूने उभे राहिले पाहिजे यासाठी हा निधी दहा करून देण्यात आला आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. मालेगाव, लहान, येळेगाव या मोठ्या ग्रामपंचायतीला प्रत्येकी ८० लाख तर इतर ग्रामपंचायतीला सहा ते बारा लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा विनियोग चांगला व्हावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com