कुंडलवाडीचा कारभार पत्नीऐवजी पतीच्या हातात, कशामुळे ते वाचा...

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 9 September 2020

अपात्र ठरलेल्या कुंडलवाडीच्या महिला नगराध्यक्षांना नियमानुसार त्यांनी आपल्या पदाचा पदभार उपाध्यक्ष यांच्याकडे सोपविला.

नांदेड : कुंडलवाडी नगरपरिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा न्यायालयीन लढाईत पराभव पत्करत अपात्र ठरल्या होत्या. अपात्र ठरलेल्या कुंडलवाडीच्या महिला नगराध्यक्षांना नियमानुसार त्यांनी आपल्या पदाचा पदभार उपाध्यक्ष यांच्याकडे सोपविला. उपाध्यक्ष हे दुसरे- तिसरे कोणी नसून दस्तुरखुद्द त्यांचे पति असल्याने पत्नीच्या अध्यक्षपदाचा कारभार पतिच्या हातात आला आहे.

आजवर पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्या पतिराजांना अध्यक्षपदाची सुत्रे मिळाल्याने हा विषय चर्चिला जात आहे. राजकारणात महिलांना संधी मिळण्यासाठी आरक्षण जाहीर केले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या महिलांचे पती किंवा अन्य पुरुष नातेवाईक काम करतात हे आता लपून राहिलेले नाही. जिल्ह्याच्या मोठ्या नेत्याने काही वर्षापूर्वी एका कार्यक्रमात असे भाष्य कले होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरून देखील अशा कृतींना फारसा विरोध केला जात नाही.

हेही वाचाकुख्यात विक्की चव्हाणचा खूनी पिस्तुलसह अटक- स्थागुशा -

अरुणा कुडमलवार यांची थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवड झाली होती

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्यामुळे पुरुषांची अडचण वाढली होती. आपल्या सौभाग्यवती किंवा आई किंवा कुटुंबातील अन्य महिलेला स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रवेश देण्याची वेळ त्यांच्यावर आली. परंतु कारभार मात्र आपल्या हाती राहावा यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. जिल्ह्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थेत पती आणि पत्नी दोघांचीही निवड झाल्यामुळे संयुक्त कारभार चालतो. कुंडलवाडी नगरपालिकेच्या सन २०१६ साली झालेल्या निवडणुकीत अरुणा कुडमलवार यांची थेट जनतेतून नगराध्यक्ष पदी निवड झाली होती. 

पती विठ्ठल कुडमलवार यांना संधी

त्यावेळी भाजपचे पूर्ण बहुमत असलेल्या नगरपालिकेच्या त्या एकमेव नगराध्यक्ष होत्या. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयीन प्रकरणे झाल्यानंतर शासनाने सोमवारी त्यांना अनर्ह (रद्द) ठरवले. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कुंडलवाडी नगरपालिकेवर भाजपचेच पूर्ण बहुमत असल्याने तेथील नगराध्यक्षांच्या निवडीबाबत फारशी उलथापालथ होण्याची शक्यता नाही. परंतु कुडमलवार यांच्या अनर्हस्थेमुळे रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान त्यांचे पती विठ्ठल कुडमलवार यांना मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The management of Kundalwadi is in the hands of the husband instead of the wife nanded news