कुख्यात विक्की चव्हाणचा खूनी पिस्तुलसह अटक- स्थागुशा

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 9 September 2020

विक्की चव्हाण याचा खून करून फरार असलेल्या मुख्य आरोपीतापैकी एकाला सिनेस्टाईल पकडले. त्याच्याकडून एक पिस्तुल व तीन जीवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (ता. आठ) रात्री साडेनऊच्या सुमारास नांदेड ते मालेगाव रस्त्यावर एका धाब्याजवळ केली. अटक केलेला आरोपी प्रदीप श्रावणे (वय २२) महालक्ष्मीनगर, पुसद (जिल्हा यवतमाळ) येथील रहिवासी आहे.

नांदेड : कुख्यात असलेला व पोलिसांची डोकेदुखी वाढविणारा विक्की चव्हाण याचा खून करून फरार असलेल्या मुख्य आरोपीतापैकी एकाला सिनेस्टाईल पकडले. त्याच्याकडून एक पिस्तुल व तीन जीवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (ता. आठ) रात्री साडेनऊच्या सुमारास नांदेड ते मालेगाव रस्त्यावर एका धाब्याजवळ केली. अटक केलेला आरोपी प्रदीप श्रावणे (वय २२) महालक्ष्मीनगर, पुसद (जिल्हा यवतमाळ) येथील रहिवासी आहे. या टोळीविरुद्ध लवकरच गंभीर गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

नांदेड शहराच्या गाडेगाव या वळण रस्त्यावर आॅगस्ट महिण्यात कुख्यात असलेला विकी चव्हाण याच्यावर गोळीबार करून त्याचा खून करुन आरोपीतांनी आपल्याच एका चारचाकी वाहनातून अपहरण करून हस्सापूर (ता. नांदेड) शिवारात असलेल्या गोदावरी नदीच्या झूडपात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध घेतला असता हस्सापूर शिवारात विक्की चव्हाण याचा छन्नविछन्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यानंतर या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -  ऐकावे ते नवलच : चक्क ‘या’ गावात गाय आणि म्हैस पाळत नाहीत -
 
नांदेड ते मालेगाव रस्त्यावर असलेल्या एका धाब्यावर थरार

या प्रकरणात पोलिसांनी पाच मारेकऱ्यांना अटक करुन पोलिस कोठडीनंतर त्यांची रवानगी कारागृहात केली. मात्र यातील मुख्य आरोपी व त्याचा एक सहकारी फरार होते. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, फौजदार आशिष बोराटे, सहाय्यक फौजदार अब्दल रब आणि श्री. शेळके हे शहरात गस्तवर होते. श्री. भारती यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी नांदेड ते मालेगाव रस्त्यावर असलेल्या एका धाब्यावर आरोपी प्रदीप श्रावणे हा थांबला असल्याचे समजले. 

प्रदीप श्रावणे हा दहशत पसरवत होता

यावेळी पोलिसांनी शिताफीने सापळा लावून धाबा परिसरात दबा धरुन बसले. आरोपी हा सारईत गुन्हेगार असल्याने त्याला पकडणे सहज सोपे नव्हते. मात्र ही चाहूल प्रदीप श्रावणे याला लागताच त्याने तेथून धूम ठोकली. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करत अखेर त्याला पकडले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडील एक पिस्तुल व तीन जीवंत काडतूस जप्त केले. पोलिस आणि आरोपी हा थरार रात्री अर्धा तास सुरु होता. यातील मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील अनेक दिवसापासून नांदेडच्या काही भागात हा प्रदीप श्रावणे हा दहशत पसरवत होता. तो अजून काही गुन्ह्यात आहे का याची कसुन चौकशी करुन त्याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. विमानतळ पोलिस त्याला बुधवारी (ता. नऊ) न्यायालयासमोर हजर करणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vicky Chavan arrested with murderous pistol by lcb nanded news