पैनगंगेच्या पुरामुळे अनेकांची शेती पाण्याखाली; पिकांचे नुकसान

प्रकाश जैन
Thursday, 24 September 2020

सततच्या पावसामुळे तसेच पैनगंगा नदीवरील इसापूरच्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

हिमायतनगर - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने खरिपाच्या पेरणीतील पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. तसेच इसापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून संभाव्य धोका टाळण्यासाठी इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी पैनगंगेला पूर आला आहे. पैनगंगा नदी ही आजूबाजूचा परिसर कवेत घेऊन वाहत असल्याने नदीकाठावरील हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

हिमायतनगर तालुक्यात यावर्षी पाऊस जास्त झाल्याने खरिपाच्या पेरणीतील कापूस व सोयाबीनची स्थिती नाजूक बनली आहे. पेरणीतील सोयाबीन काढणीला आले असताना या भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीनला अतिपावसाने मोड फुटले आहेत. उत्पादनाच्या प्रमुख स्रोतातील व शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाचे पीक उन्मळून नुकसान झाले आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर

मराठवाडा - विदर्भाला जोडणारा रस्ता बंद
भरीस भर म्हणून की, काय इसापूर धरणातून पैनगंगेत पाणी सोडण्यात आल्याने पैनगंगेला महापूर आला आहे. नदी आसपासची शेती कवेत घेऊन वाहत असल्याने नदीकाठावरील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हिमायतनगर आणि ठाणकी म्हणजेच मराठवाडा व विदर्भाला जोडणारा १८ किलोमीटरचा जवळचा असणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर गाजेगाव पुलावरून नऊ फुटापर्यंत पाणी वाहत असल्याने हा रस्ता बंद पडला आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड - कोरोनामुळे मृत्यूचे सत्र थांबता थांबेना , गुरुवारी २३६ जण पॉझिटिव्ह, सात बाधितांचा मृत्यू

शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
उन्हाळ्यात याच पैनगंगेला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करावे लागते. या भागातील जनता इसापूर धरणातून पाणी सोडण्यासाठी टाहो फोडते. परंतु पावसाळ्यात मात्र धरणातून पाणी सोडण्यात येऊन पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल पैनगंगा नदीकाठावरील बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
संपादन - अभय कुळकजाईकर, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many farms submerged due to Panganga floods; Crop damage, Nanded news