भक्तीचा बाजार मांडणाऱ्या भोंदूबाबांच्या नादी लागू नका....कोण म्हणाले वाचा...

अभय कुळकजाईकर
Tuesday, 18 August 2020

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मराठवाडास्तरीय वैज्ञानिक दृष्टीकोन विकास आणि जादूटोणा विरोधी कायदा तीन  दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण शिबिर नुकतेच झाले. या मध्ये नशीब, भूत, भानामती, मंत्रतंत्र, करणी, जादूटोणा, बुवाबाजी, चमत्कार, देव - देवी अंगात येणं, नेमकं काय असते? याबाबत जादूटोणा विरोधी कायदा काय सांगतो? याबाबतची माहिती देण्यात आली. 

नांदेड - संत नामदेव, ज्ञानोबा, तुकोबापासून ते संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्यासारख्या खऱ्या संतांची अनिष्ट, अघोरी प्रथांवर वार करणारी शिकवण महत्वाची आहे. वारकऱ्यांची समतेची, जनजागरणाची खरी शिकवण विसरू नका. त्याचबरोबर भक्तीचा बाजार मांडणाऱ्या आजच्या भोंदूबाबांच्या मागे लागू नका,असे आवाहन अंनिसचे राष्ट्रीय सल्लागार तथा प्रख्यात वक्ते अॕड गणेश हलकारे यांनी मराठवाडा विभागीय शिबिरात संत कुणाला म्हणावे? या विषयावर व्याख्यान देतांना केले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मराठवाडास्तरीय वैज्ञानिक दृष्टीकोन विकास आणि जादूटोणा विरोधी कायदा तीन  दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण शिबिर नुकतेच झाले. यात ७१९ शिबिरार्थींनी नोंदणी केली मात्र, प्रत्यक्षात एक हजार १०८ दर्शकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. 

हेही वाचा - नांदेडकरांना गुड न्यूज : विष्णुपूरी प्रकल्प तुडूंब, एक दरवाजा उघडला

तीन दिवस अभ्यासपूर्ण मार्गदर्शन 
या मध्ये नशीब, भूत, भानामती, मंत्रतंत्र, करणी, जादूटोणा, बुवाबाजी, चमत्कार, देव - देवी अंगात येणं, नेमकं काय असते? याबाबत जादूटोणा विरोधी कायदा काय सांगतो? यावर समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, राज्य युवा संघटक पंकज वंजारे, मराठवाडा प्रमुख किशोर वाघ यांनी चमत्कार, प्रात्यक्षिके व प्रश्नौत्तरांसह तीन दिवस अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

मराठवाड्याला मिळाला मान
यावेळी हरिभाऊ पाथोडे यांनी समितीचा देवाधर्माला विरोध नसून देवाधर्माच्या नावावर सामान्य माणसाची फसवणूक करणाऱ्यांना आहे. तर पंकज वंजारे म्हणाले की, कोणताही चमत्कार सिद्ध करा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे २५ लाख रुपयांचे बक्षीस जिंका. मराठवाडा प्रमुख किशोर वाघ यांनी देशातील पहिले ऑनलाइन तीन दिवसीय यशस्वी शिबिर घेणाचा सन्मान मिळवणाऱ्या मराठवाडा आयोजन समितीचे आणि विभागातील सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोलीत ४६५ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती
 

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले नियोजन
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तांत्रिक व्यवस्था प्रमुख नरेंद्र पाटील, प्रशांत वेडेकर, औरंगाबाद जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, हिंगोली प्रमुख प्रकाश मगरे, जालना प्रमुख सुनिल वाघ, बीड प्रमुख प्रा. सचिन झेंडे, नांदेड प्रमुख प्रा. इरवंत सुर्यकार यांच्यासह प्रा. भिसे, पांडुरंग मोमीदवार, पत्रकार गंगाधर कुडके, शिद्बोधन कापसीकर यांच्यासह अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada level online camp by Akhil Bharatiya Andhashraddha Nirmulan Samiti, Nanded news