Nanded : धर्माबादमध्ये मायक्रो फायनान्सचे महिलांना वेड ; चक्रवाढ व्याजाने उडाल्या झोपा

गावागावात फायनान्स कंपन्यांच्या दलालांनी आपले जाळे पसरवत सामान्य कुटुंबातील महिलांना पैसे वाटप करण्याचा धंदा सुरू केला आहे. त्यासाठी कर्मचारी नेमले आहेत.
nanded
nandedSakal

धर्माबाद : बचत गटाची चळवळ ग्रामीण भागात घट्ट रुजली आहे. यातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत. मात्र, मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकलेल्या असंख्य बचतगटांच्या महिलांची उन्नती होण्याऐवजी त्या अधोगतीकडेच चालल्या आहेत. मायक्रो फायनान्सच्या चक्रवाढ व्याजाने महिलांच्या झोपा उडवल्या आहेत. व्याज भरण्यासाठी महिलांना बेकायदा सावकारांच्या दारात उभे राहावे लागत आहे. दारिद्र्य दूर करण्यासाठी महिला कर्ज घेत असल्यातरी अशा फायनान्समुळे त्यांच्यावर दारिद्र्य जीवन जगण्याची वेळ आल्याचे चित्र धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

बचत गटांना शहरातील काही बँकांनी कर्ज देऊन त्यांच्या या उद्योगाला उभारी दिले. सुरळीत सुरू असलेल्या बचतगटांकडे काही फायनान्स कंपन्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी या महिलांच्या आर्थिक दुर्लभतेचा फायदा उचलत व्याजाच्या कचाट्यात पकडले. महिला कर्ज कशासाठी घेतात, याची शहानिशा न करता कर्जवाटप करून त्यांच्याकडून आठवड्याला फेड करणार, असा करारच करून घेण्यात आला आहे. शासकीय बचतगटांची संकल्पना अनेकांना माहिती होती; परंतु कर्ज घेण्यासाठी बचत गट तयार होऊ लागले.

आठवड्यात एक दिवस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वसुली सुरू केल्याने अनेकांना हप्ता भरण्यासाठी कर्जबाजारी व्हावी लागले. काहींनी तर गावात असलेल्या खाजगी सावकारांकडून देखील हप्ते भरण्याकरिता कर्ज उचलण्याची चर्चा होत आहे. गावागावात फायनान्स कंपन्यांच्या दलालांनी आपले जाळे पसरवत सामान्य कुटुंबातील महिलांना पैसे वाटप करण्याचा धंदा सुरू केला आहे. त्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. कर्ज घेण्याकरिता महिला एकमेकींना तयार करतात आणि बचत गट स्थापन करतात. कागदावर स्वाक्षरी झाल्या की या महिलांना कर्जाचे वाटप होते. हप्ते भरताना मात्र मोठी अडचण येते. अखेर सावकारांपुढे हात पसरावे लागत आहेत. कंपनीचे वसुलीसाठी ठेवलेले लोक कर्जदार महिलांना त्रास देत असल्याची ओरड होत आहे.

कर्जबाजारीमुळे घरोघरी ताणतणाव

पूर्वी शेतकरीच कर्ज घेतो, असे वाटायचे; परंतु आता तर ग्रामीण महिला देखील मायक्रो फायनान्सकडून भरमसाठ प्रमाणात कर्ज घेऊन कर्जबाजारी बनले आहेत. त्यामुळे घरात देखील ताणतणाव उद्भवत आहे. सूक्ष्म कर्ज म्हटले तरी त्यांचा व्याजदर मोठा असतो. कर्ज वाटताना ठरल्यानुसार हप्ता द्यावाच लागतो. एखाद्या महिलेकडे पैसे नसतील तर तिच्यावर अन्य महिला प्रचंड दबाव आणतात. असे बहुतेक गावात तयार झाल्याने महिलांची सध्या कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com