esakal | बनावट बियाणे विकणाऱ्या दोघांविरुद्ध मध्यरात्री कारवाई; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा

बनावट बियाणे विकणाऱ्या दोघांविरुद्ध मध्यरात्री कारवाई; गुन्हा दाखल

sakal_logo
By
शशिकांत धानोरकर

तामसा ( जिल्हा नांदेड ) : केंद्र शासनाने बंदी घातलेले एचटीबीटी हे कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना विकून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कृषी विभागाने सापळा रचून रविवारी (ता. १३ ) मध्यरात्री कारवाई केल्याने खळबळ उडाली असून याबाबत तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी मारुती पवार राहणार शिवनी (ता. हदगाव) व काशिनाथ कंठाळे रा. अहमदनगर यांनी संगनमताने किनवट व हदगाव तालुक्यात उत्पादन, विक्री व पेरणी करण्यास बंदी असलेल्या एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री चालविली.

याबाबतची कुणकुण कृषी विभागाला होती. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा कृषी अधीक्षक शिवशंकर चलवदे, जिल्हा कृषी अधिकारी संतोष नादरे यांनी बंदी घातलेले पण बेकायदेशीररित्या साठवण करुन विक्री करणाऱ्या रॅकेटचा शोध लावण्यासाठी पथके तयार केली होती. किनवट तालुक्यातील उमरी बाजार येथे एका कृषी दुकानदारास आरोपी काशिनाथ कंठाळे याने एचटीबीटी बियाणांची पाकीटे खरेदी करण्याबाबत विचारणा केली. पण दुकानदाराने नकार देउन ही माहिती किनवटच्या कृषी अधिकारी संजय घुमटकर यांना कळविली. आरोपी कंठाळेला कृषी विभागाने सापळा रचून पाकीट खरेदी करण्याबाबत विश्वासात घेतले.

हेही वाचा - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये नव्या रुग्णसंख्येत मोठी घट

दुसरा आरोपी मारुती पवार यांच्याकडे यांच्याकडील एचटीबीटी बियाणांचे तीस हजार किमतीची तीस पाकिटे खरेदी करण्याचा व्यवहार निश्चित झाला. तामसा ते हदगाव रस्त्यातील तळेगाव फाटा येथे रविवारी मध्यरात्री एक वाजता हदगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रल्हाद जाधव, प्रभारी मोहीम अधिकारी गजानन हुंडेकर, हिमायतनगर येथील कृषी अधिकारी पुंडलिक माने यांनी मारुती पवार याला गाठून त्याच्याकडील बंदीतील एचटीबीटी बियाणांची तीस पाकिटे जप्त करुन मारुतीसह पोलिस ठाणे गाठले. आरोपी पवारचे वाहनही जप्त करुन दोघांविरुद्ध मध्यरात्री बंदीतील कापूस बियाणे साठवणे व विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणे आदी आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

येथे क्लिक करा - म्होरके कारागृहातून सुटल्यानंतर दहशत निर्माण करू पाहणाऱ्या बहुतांश गुन्हेगारी टोळ्यांवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित मोकाचा बडगा उगारला

या प्रकारानंतर खळबळ उडाली असून दुसरा आरोपी काशिनाथ कंठाळे हा फरार आहे. तामसा येथील बाजारपेठेत आरोपींनी संगनमताने काहीना विश्वासात घेऊन बंदीतील बोगस कापूस बियाणे विक्री केल्याची शक्यता नाकारता येत नाही. आंध्र प्रदेश किंवा गुजरात येथून सदरील बोगस बियाणे मराठवाड्यात विक्रीस आल्याची बोलले जात आहे. ज्या शेतकऱ्यांची सदरील बोगस बियाणे पेरल्याने फसवणूक झाल्यानंतर त्यांना दाद ही मागता येत नाही. शेतकऱ्यांनी शासनमान्य व प्रमाणित बी- बियाणे खरेदी करुन आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर व पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रल्हाद जाधव यांनी केले आहे. पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पांढरे करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image