आमदार रत्नाकर गुट्टेना ईडीचा झटका, अडीचशे कोटींची मालमत्ता जप्त, परभणी जिल्ह्यात खळबळ

file photo
file photo

नांदेड : परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे नेहमीच चर्चेत राहणारे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात अनेक तक्रारी सक्त वसुली संचालनालय (ईडी) कडे आल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे अखेर ईडीने आमदार गुट्टे यांच्यावर बुधवारी (ता. २३) कारवाई केली. या कारवाईत आमदार गुट्टे यांच्या विविद ठिकाणाच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून लवकरच ईडीकडून आमदार गुट्टे यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवण्याचे स्पष्ट झाल्यानंतर गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची बीड, परभणी आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली असून रत्नाकर गुट्टे यांच्या चाहत्यांचे यांचे धाबे दणाणले आहे. गंगाखेड येथील आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतले होते. याप्रकरणी ईडीकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या नावे उचलल्या गेलेल्या कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेड या माध्यमातूनच त्यांच्या योगेश्वरी हॅचरीज गंगाखेड, सोलर पावर लिमिटेड इतर कंपन्यांमध्ये लावली. गंगाखेड शुगर लिमिटेड २४७ कोटींचे यंत्र, त्याप्रमाणे पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज गंगाखेड सोलर पावर लिमिटेडचा परभणी, बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकी आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेड यांची एक कोटी दहा लाख रुपये किमतीचे समभाग इत्यादी मालमत्ता असे एकूण २५५ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे
सन २०१७ मध्ये गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने २९ हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर सहा बँकांकडून तब्बल ३२८ कोटींचे कर्ज उचलले होते. गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने व बँकांचे अधिकारी यांनी संगनमत करुन ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर घेतले. त्याचबरोबर ऊस पुरवला. परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यात बरोबरच इतर राज्यातील शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार करुन पाच राष्ट्रीयीकृत बँका ज्यात आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि मुंबईची रत्नाकर बँक यांच्याकडून तब्बल २८ कोटींची रक्कम परस्पर उचलली. याबाबत शेतकऱ्यांना बँकांनी नोटिसा पाठवल्या तेव्हा हे प्रकरण उजेडात आले होते. त्यावेळी रत्नाकर गुट्टे यांच्यावर पाच जुलै २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात दोन वर्षानंतर कारवाईला सुरुवात झाली.

ता. २८ फेब्रुवारी २०१९ गंगाखेड शुगर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवळ यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर औरंगाबाद राज्य गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिस अधिक्षक लता फड, पोलिस उपाधीक्षक पठाण यांचे पथक गंगाखेडमध्ये दाखल झाले. त्यांनी रत्नाकर गुट्टे यांना अटक करुन गंगाखेड कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीश यांच्यासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. ते सध्या जमाीनावर बाहेर आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com