खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नांदेडच्या विमानतळावर स्वागत

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नांदेडच्या विमानतळावर स्वागत
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नांदेडच्या विमानतळावर स्वागत

नांदेड : नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कोरोनावर मात केल्यानंतर गुरुवारी (ता. २०) दुपारी त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. कोरोनावर मात करुन पहिल्यांदाच खासदार चिखलीकरांचे नांदेड येथे आगमन झाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने टाळ्या वाजून तसेच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. सर्वांनी कोरोना संसर्गाबाबत काळजी घ्यावी. कोरोना संसर्ग कोणालाही होऊ शकतो. कोरोनाची लागण झाल्यानंतर कोणीही घाबरुन जाऊ नये तर योग्य वेळी उपचार घ्यावेत, असे आवाहन खासदार चिखलीकर यांनी उपस्थितांना केले.

नांदेडचे खासदार चिखलीकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. गेल्या ता. ३० जुलै रोजी खासदार चिखलीकर हेही औरंगाबादला गेले होते. पुत्र प्रविण पाटील हे रुग्णालयात उपचार घेत असतानाच ता. तीन ऑगस्ट रोजी श्री. चिखलीकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनीही औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात स्वत:ला दाखल करुन घेतले.

पिता - पुत्राने केली कोरोनावर मात
पिता - पुत्र चिखलीकर हे दोघेही कोरोनावर मात करुन रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर काही दिवस विश्रांती घेण्यासाठी खासदार चिखलीकर यांनी मुलगी प्रणीता देवरे चिखलीकर हिच्याकडे मुंबई येथे थांबले होते. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर गेल्या दोन दिवसापूर्वीच प्रविण पाटील हे नांदेडला आले होते. गुरुवारी दुपारी दोन वाजता खासदार चिखलीकर यांचे विमानाने नांदेडला आगमन झाले. विमानतळावर कार्यकर्त्यांनी भेटीसाठी येवू नये, असे आवाहन केल्यानंतरही त्यांच्या हितचिंतकांनी नांदेड विमानतळावर स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले स्वागत
खासदार चिखलीकर यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर उपस्थितीत कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगांवकर, भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले, जिल्हा संघटक गंगाधर जोशी, सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, प्रविण पाटील चिखलीकर, लक्ष्मण ठक्करवाड, बालाजी बच्चेवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख, मारोती वाडेकर, जिल्हा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे, लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक दत्ता वाले, शेख करीम, महिला आघाडीच्या महादेवी मठपती, विजय गंभीरे, मिलींद देशमुख, बालाजी पाटील मारतळेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेच्या सेवेत रुजू - चिखलीकर
कोरोनावर मात करुन सुखरुप नांदेडला परत आल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्यावतीने भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगांवकर यांनी श्री. चिखलीकर यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. वसंतनगर येथील निवासस्थानी आल्यावर श्री. चिखलीकर यांचे त्यांच्या पत्नी प्रतिभाताई चिखलीकर व इतरांनी औक्षण केले. यावेळी श्री. चिखलीकर म्हणाले की, सर्वसामान्य जनतेचे आशिर्वाद व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सदिच्छा यांच्या बळावर आपण कोरोनावर मात करुन सर्वसामान्य जनतेच्या सेवेत रुजू झालो आहोत. कोरोना संसर्ग होवू नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. आवश्यक काम असेल तरच घरच्या बाहेर पडावे. कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोणीही घाबरुन जावू नये. तत्काळ रुग्णालयात दाखल होवून औषधोपचार घ्यावा, असे आवाहनही श्री. चिखलीकर यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com