महावितरण : कोरोना यौध्यांचा मुख्य अभियंत्याकडून गौरव 

प्रल्हाद कांबळे
Monday, 17 August 2020

लॉकडाऊन काळातील सेवेबाबत कर्मचारी, अधिकारी कोरोना यौध्दा पुरस्काराने सन्मानीत

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्या वतीने ७४ व्या स्वातंत्र्य दिन विद्युत भवन परिसर येथे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल अंतराचे भान राखत याप्रसंगी सन २०१९-२० या वार्षामध्ये उत्कृष्ट कामगीरी बजावणाऱ्या ३४ लाइनमन व सात यंत्रचालक यांचा गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर लॉकडाऊन काळात अखंडीत वीजसेवेसाठी अविश्रांत प्रयत्न करत सामाजिक बांधीलकी जपत काम करणाऱ्या ५० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा महावितरणचे कोरोना यौध्दा पुरस्काराने सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य लढयातील शहिदांना मानवंदना देत व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान किती अनमोल होते याचा उल्लेख करत महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकी जपत आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असे विचार मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, सध्या सर्वत्र कठीण काळ आहे. कोरोना संक्रमणामुळे सर्वच यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. महावितरणचीही आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे. त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांनी अखंडीत वीजसेवेसह ग्राहकाभिमुख सेवा द्यावी. वीजदेखभाली संबंधी आलेल्या तक्रारींचे त्वरीत निवारण करून वीजदेयक भरण्यास ग्राहकांना प्रवृत्त करावे असे आवाहन करत पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचाNanded Corona : रविवारी १०२ रुग्ण झाले बरे, बाधित रुग्ण ९५ तर तिघांचा मृत्यू

यांची होती उपस्थिती

नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे, अधीक्षक अभियंता प्रविण नाईक यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळयाचे सुत्रसंचालन विधी अधिकारी ॲड. शैलेंद्र पाटील यांनी केले. तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र बागूल यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुशिल पावसकर, कार्यकारी अभियंता भूषण पहूरकर, शिरीष भिसे, व्यवस्थापक मासं सुदर्शन कालेवाड, प्रांजल कांबळे, श्री. अंबेकर, प्रणाली विष्लेषक मंहम्मद तौसीफोद्दीन पटेल आदी परिमंडळाचे व नांदेड मंडळाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL: Corona Warriors honored by Chief Engineer nanded news