esakal | महावितरण :  नांदेड जिल्ह्यात ३६ ठिकाणी वीजबील भरणा केंद्र सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

लॉकडाऊनच्या मर्यादा पाळून स्विकारणार देयके, वीजबील भरण्यासाठी जवळच्या वीजबील भरणा केंद्रावर जाण्याचे किंवा आॅनलाईन बील भरण्याचे आवाहन.

महावितरण :  नांदेड जिल्ह्यात ३६ ठिकाणी वीजबील भरणा केंद्र सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुशंगाने शासनाने तयार केलेल्या प्रमाणीत कार्यप्रणालीचा अवलंब करत गेल्या दीड ते दोन महिन्याच्या कालावधी नंतर महावितरणची वीजबील भरणा केंद्रे मंगळवार (ता. १२) पासून सुरु करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या परवानगीनुसार जिल्ह्यात ३६ ठिकाणी वीजबील भरणा केंद्र सुरू करण्याचा निर्णय महावितरणच्या नांदेड परिमंडळाने घेतला आहे.

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलांची रक्कम भरण्यासाठी ऑनलाईनची सोय असली तरी  अनेक वीजग्राहक भरणा केंद्रावर जावूनच वीजबील भरणे पसंत करतात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून महावितरणचा महसूल मोठ्या प्रमाणावर घटला होता. वीजग्राहकांची होणारी अडचण व महावितरणच्या महसुलात होणारी घट लक्षात घेवून नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी जिल्हाधिकारी  डॉ. विपीन यांना पत्र लिहून वीज बील भरणा केंद्र सुरू करण्याची परवानगी मागितली होती. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची परवानगी

यावरून जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपाययोजनाच्या आधीन राहून योग्य ती काळजी घेत आजपासून वीजबिल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी नांदेड परिमंडळांतर्गत येणाऱ्या सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना शारिरिक अंतर ठेवत कामाच्या ठिकाणी हॅन्डवॉश, सॅनीटायझरचा वापर करणे तसेच कामाच्या वेळेचे भान राखत मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू, ठिकाणे वेळोवेळी नियमीत निर्जंतुकीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

हेही वाचा मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा निर्णय लवकर घ्यावा...

जिल्ह्यात ‘या’ ३६ ठिकाणी वीजबील भरणा केंद्र

नांदेड शहरातील मीलगेट, तरोडानाका, एमआयडीसी, सिडको व कौठा परिसरातील वीजबील भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तर अर्धापूर, मालेगाव, मुदखेड, बारड, लोहा, माळाकोळी, सोनखेड, कलंबर, उस्माननगर, कापसी, कंधार, बारूळ, बिलोली, देगलूर शहरातील चार ठिकाणी, तसेच धर्माबाद, मुखेड, नायगाव, नरसी, भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर, किनवट व माहूर या ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस व एनईएफटी’ ची सुविधा

सध्या लॉकडाऊनमुळे बँकींग व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ही अडचण लक्षात घेऊन महावितरणने १० हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस व एनईएफटी’ ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच सिंगल किंवा थ्रीफेज घरगुती वीजग्राहकांनाही आता १० हजारांपेक्षा अधिक वीजबिलांची रक्कम या प्रणालीद्वारे भरता येईल. यासोबतच सर्वच प्रकारच्या ग्राहकांसाठी ऑनलाईनद्वारे क्रेडीट कार्ड, नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, गुगल पे, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेट आदींद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा सुरु राहणार आहे. वीजग्राहकांनी लॉकडाऊनची स्थिती पाहता शक्यतो ऑनलाईनचा वापर जास्त प्रमाणात करावा त्याचबरोबर वीजबील भरणा केंद्राच्या ठिकाणी शारिरिक अंतराची मर्यादा सांभाळत व तोंडावर मास्कचा वार करूनच वीजबिलाचा भरणा करावा असे अवाहन महावितरणनच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

येथे क्लिक कराकंधारमधील `या` गावातील घरफोडीत पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे थेट पेमेंट लिंक पाठविण्यात येते

‘एसएमएस’द्वारे थेट पेमेंट लिंक घरबसल्या वीजबिलांचा ऑनलाईनद्वारे भरणा करण्यासाठी महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे थेट पेमेंट लिंक पाठविण्यात येत आहे. नोंदणीकृत मोबाईलधारक वीजग्राहकांना वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींसह पेमेंट लिंकसुद्धा पाठविण्यात येत आहे. या लिंकद्वारे संबंधीत ग्राहकांना स्वतःचे वीजबिल ऑनलाईनद्वारे थेट भरण्याची सोय आहे. ज्या वीजग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9930399303 क्रमांकावर MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ करावा. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावर किंवा ‘महावितरण’ मोबाईल ॲपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.