मुदखेड शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार, कसा तो वाचा...

अभय कुळकजाईकर
Thursday, 20 August 2020

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बळेगाव बंधाऱ्यातून मुदखेडला १.८४ दलघमी वाढीव पाणी मिळणार आहे.

नांदेड - जिल्ह्यातील भोकर, अर्धापूर येथील पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुदखेड शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटविला आहे. विशेष प्रयत्न करून श्री. चव्हाण यांनी बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातील सुमारे १.८४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मुदखेड शहरासाठी आरक्षित केला आहे. त्यामुळे मुदखेड शहराला पुढील तीस वर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्रश्न सोडविता यावेत म्हणून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवून घेतले. नांदेड शहरात कोरोना रुग्णांसाठी दोनशे बेडचे सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पीटल उभारले. तसेच १३ हजार किलोलिटरचा ऑक्सीजन टँकही उपलब्ध करून दिला आहे. शहरासह ग्रामीण भागातही त्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अर्धापूर शहरात व भोकर शहरात पाणी पुरवठा योजना आणून या दोन्ही शहरांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढलेला आहे.

हेही वाचा - नांदेड- बुधवारी सर्वात जास्त २३० कोरोना बाधित रुग्णांची नोंद 

मुदखेडचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला
मुदखेड शहरालाही पाणी टंचाईची झळ बसत होती. शहराला लगतच्या तलावातून पाणी पुरवठा होतो. पण ते पुरेसा नसल्याने शहरवासियांची पाण्यासाठी परवड होत होती. पण पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी मुदखेड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यावर भर दिला. या शहराची वाढती गरज लक्षात घेवून श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून मुदखेडसाठी तब्बल १.८४ दशलक्षघनमीटर पाणी मिळण्याचा प्रस्ताव ता. ३० एप्रिल रोजी राज्य सरकारला सादर केला होता.

हेही वाचलेच पाहिजे - अनुसूचित जमातीच्या अमंलबजावणीसाठी धनगर समाजाने असे केले आंदोलन... 

मुदखेडची २०५१ पर्यंतची समस्या मिटली 
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करून बळेगाव बंधाऱ्यातून १.८४ दशलक्षघनमीटर पाणीसाठा मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे मुदखेड शहराची २०५१ पर्यंतची पाणी समस्या कायमस्वरुपी मिटली आहे. बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याची १०.४४ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. त्यातील ३०.५५ टक्के म्हणजेच ३.१० दलघमी पाणी घरगुती वापरासाठी राखीव आहे. त्यातील तब्बल १.८४ दलघमी पाणी मुदखेड शहरासाठी राखीव करण्यात आले आहे. शहराची पाणी समस्या कायमची मिटल्याने मुदखेड शहरवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mudkhed city's water problem will be solved forever, how to read it ..., Nanded news