मुक्रमाबाद धान्य घोटाळा : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 23 September 2020

जिल्ह्यात मुक्रमाबाद (ता. मुखेड) येथे शासकिय वितरणाच्या धान्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या धान्य घोट्याळाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात असल्याने ते काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदेड : जिल्ह्यातील कृष्णूर धाण्य घोटाळा राज्यभर गाजला असून या प्रकरातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. हा तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभाग करत असतानाच पुन्हा जिल्ह्यात मुक्रमाबाद (ता. मुखेड) येथे शासकिय वितरणाच्या धान्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या धान्य घोट्याळाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात असल्याने ते काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

धान्य वाहतूक ठेकेदारास जिल्हा पुरवठा विभागाकडून अभय दिले जात असल्याची चर्चा आहे. कृष्णूर धान्य घोटाळा राज्यभर गाजल्यानंतर मुक्रमाबाद शासकीय गोदामातून धान्याला खुल्या बाजारपेठेत पाय फुटले. त्यावर चौकशी सुरू आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेकेदाराची सुनावणी पूर्ण झाली. निर्णय मात्र प्रलंबित ठेवला आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -  कोरोना संक्रमण : पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी बाधीत -

कृष्णूर घोटाळ्यात ठेकेदाराला तुरुंगातही जावे लागले 

सन २०१८ या एका वर्षात तीन वेळा धान्य व्यपगत (अपहार) केल्यानंतरही शासन निर्णयानुसार आकारलेल्या दंडाची वसुली झालीच नसल्याची तक्रार राज्याच्या प्रधान सचिवांकडे करण्यात आली आहे. न्यायालयात चाललेल्या खटल्यानंतर २०१८ मध्ये नव्या वाहतूक ठेकेदाराची निवड करण्यात आली. या निविदा प्रकरणातही न्यायालयात दावे प्रतिदावे झाले. अखेर पारसेवार अँड कंपनीला धान्य वाहतुकीचा ठेका देण्यात आला. यातील एका टप्प्यातील वाहतुकीचे दर शासकीय दरापेक्षा कमी आहे. घोटाळ्यात या ठेकेदाराला तुरुंगातही जावे लागले आहे. या ठेकेदाराच्या अखत्यारीत धान्य वाहतूक जिल्हा पुरवठा विभागाला करावी लागत आहे. यामागे न्यायालय, विभागीय आयुक्तांचे दाखले दिले जात आहेत.

१२ कोटी ५२ लाख ४५ हजार ६०० रुपयांचे धान्य घोटाळा 

कोरोना महामारीच्या संकटात लाखो मेट्रीक टन वाहतूक पारसेवार अँड कंपनीने केली आहे. त्यात २०१८ मध्ये एकाच वर्षात मंजूर नियंत्रणाच्या धान्याची वाहतूक न करता बाजारभावाप्रमाणे १२ कोटी ५२ लाख ४५ हजार ६०० रुपयांचे धान्य घोटाळा केल्याचा प्रकार पुढे आला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने धान्य अपहार प्रकरणी दहा टक्के दंड आकारावा असे शासन निर्णयात स्पष्ट नमूद आहे. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी ऑगस्ट २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत केलेल्या धान्य वाहतूक ठेकेदाराकडून एक कोटी २५ लाख २४ हजार ५६० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरीही दंडाची रक्कम वसूल न करता धान्य वाहतूक ठेकेदारांना अभय दिले जात असल्याची तक्रार फ्रेम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवीण पालदेवार यांनी केली आहे.

येथे क्लिक करा मदरसे मिलिया उर्दू हायस्कुलची लिपीक आणि सदस्य लाचेच्या जाळ्यात -

कृष्णूर धान्य घोटाळ्यापाठोपाठ आता मुक्रमाबाद घोटाळा समोर 

सदर तक्रारदाराने पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. दरम्यान कृष्णूर धान्य घोटाळ्यापाठोपाट आता मुक्रमाबाद घोटाळा समोर आल्यानंतर मुक्रमाबाद प्रकरणाची वेगवेगळ्या स्तरावर चौकशी केली जात आहे. दरम्यान मुखेडमधील धान्य घोटाळ्याच्या चौकशीचा अंतिम अहवाल येणे बाकी असून ठेकेदार यांनी दिलेल्या खुलाशानंतर निर्णय घेणे बाकी आहे. देगलूर तहसीलदार सदर प्रकरणात स्वतंत्र चौकशी करीत आहेत. तर मुखेड तालुक्यातील २०० स्वस्त धान्य दुकानांची चौकशी करण्यात आली. लाभार्थ्याचे जवाब, तक्रारी, सूचना या चौकशीत घेतल्याचे सांगण्यात आले आहे. खुद्द जिल्हाधिकारी यांनी वाहतूक ठेकेदारांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत ऑनलाइन सुनावणी घेतली. या सुनावणीनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukramabad grain scam: Attention to the decision of the District Collector nanded news