
नांदेड : विश्वशांती व देशाच्या भरभराटीसाठी प्रार्थना
नांदेड - रमजान महिन्याच्या समारोपावर शहरातील लाखो बांधवांनी रमजान ईद निमित्ताने जुनी व नवीन ईदगाहवर जोमाने व उत्साहाने इद-उल-फित्र म्हणजे रमजान ईदची नमाज मंगळवारी (ता.तीन) अदा केली. यावेळी विश्व् शांती, बंधूभाव व देशाच्या उन्नती व भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली. देगलूर नाका परिसरातील जुनी ईदगाह व वाघी रोड येथील नवीन ईदगाह येथे मंगळवारी सकाळी लाखो मुस्लिम बांधवानी रमजान ईदची नमाज अदा केली. कोरोनामुळे मागील दोन वर्ष ईदगाहवर नमाज झाली नव्हती. त्यामुळे आज इदगाहवर भाविकांमध्ये कमालीचा उत्सहात दिसून आला. अबालवृद्ध मोठ्या संख्येने सकाळी दोन्ही ईदगाहवर एकत्रित झाले होते. सकाळी साडेआठ वाजता दोन्ही ठिकाणी नमाज पठण करण्यात आली. जुनी ईदगाह येथे प्रारंभी ज्येष्ठ कमेटी सदस्य अॅड.एम.झेड. सिद्दीकी यांनी लोकांना संबोधित केले. या वेळी त्यांनी इदगाह कमिटीचे कतीब स्वर्गीय काजी मोहिउद्दीन यांची आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुफ्ती खलील उर रहमान यांनी बयान केले. नंतर मुफ्ती साद अब्दुल्ला नदवी यांनी नमाज व खुतबा पठण करून दुआ केली. दुआ नंतर मुस्लिम भाविकांनी इमाम व एकमेकांशी गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. आज सकाळी ईदगाह बरोबरच शहरातील विविध मशिदीमध्येही हजारो भाविकांनी ईदची नमाज अदा केली. ईदगाह परिसरात सकाळपासूनच पोलिस विभागाचा चोख बंदोबस्त होता तर खिदमते उम्मत या संघटनेच्या स्वयंसेवकांनी ट्राफिक व्यवस्था सांभाळली. वाघी रोड येथील नवीन ईदगाह येथे मुफ्ती शाहीद कास्मी यांनी नमाज पठण व दुआ केली. नमाज नंतर कमेटीतर्फे बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून विशेष आभार व्यक्त केले.
रमजान ईदचा उत्साह
दोन वर्षाच्या खंडाने आलेल्या ईदचा उत्साह अबाल वृद्ध महिला व युवकांमध्ये दिसून आला. घरोघरी जाऊन मित्रांनी शीर खुर्माचा आस्वाद घेतला. बालक बालिकांनी गल्लीत आलेल्या चक्री पाळणा, उंटाची स्वारी करून व खेळणी घेऊन धमाल केली. नवीन कपडे व मेहंदी काढून मुलींनीही ईदचा आंनद लुटला. एकूणच आज शहरात सर्वत्र अबाल वृद्ध, महिला व बालगोपालमध्ये रमजान ईदचा उत्साह दिसून आला.
Web Title: Muslim Brothers Perform Eid Ul Fitr Prayers In Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..