माझा सर्वात महत्वाचा गुरू म्हणजे आई - विजयकुमार मगर

file photo
file photo

नांदेड : संबंध भारतदेशात गुरुपौर्णिमा म्हणून पाच जूलै हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. शिष्य आपल्या गुरूबद्दल चांगल्या भावना व्यक्त करतो. त्या गुरुनेही आपल्या शिष्याला जीवनाचा खरा मार्ग दिखविणे गरजेचे असत. ज्याचा गुरू चांगला आहे त्याचा शिष्यही चांगलाच राहतो असे मत पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केले. 

विजयकुमार मगर यांनी पुढे सांगितले की, माझ्या आयुष्यात खरे सांगायचे तर मला प्राथमिक शाळेतच चांगले गुरू लाभले. त्यांच्यामुळेच मला शिक्षणाची खरी गोडी लागली. प्राथमिक शिक्षकाच्या शिकवणुकीची शिदोरी मला आयुष्यभर पुरत आहे. त्यामुळेच आयुष्यात यशस्वी झालो, अशा भावना पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, मी प्राथमिक शिक्षण घेत असताना कुलकर्णी नावाचे शिक्षक माझ्या वडिलांचे खास मित्र होते. त्यावेळी चौथीला स्कॉलरशिपची परीक्षा व्हायची. सरांनी माझी तिसरी पासूनच स्कॉलरशिप परिक्षेसाठी तयारी करुन घेतली. मात्र, दुर्दैवाने मी नापास झालो. पण इथूनच खरी मला अभ्यासाची सवय लागली. त्यानंतर सहावीला असताना श्री. तोडमल नावाचे गणिताचे शिक्षक मला होते. तोडमल सरांच्या मार्गदर्शनात मी पुन्हा सातवीला स्कॉलरशिपची परिक्षा दिली आणि मी त्यावेळी तालुक्यातून प्रथम आलो होतो.
 
दोनवेळा एमपीएससीची परीक्षा पास 

मी आयुष्याच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो, हा आत्मविश्वास मला बालवयातच मिळाला. त्यानंतरच्या शैक्षणिक यशस्वी प्रवासात मी मागे वळून पाहिले नाही. अकरावी- बारावी विज्ञान शाखेतून केल्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठातून कृषीची पदवी घेतली. त्यानंतर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात मी दोनवेळा एमपीएससीची परीक्षा पास झालो. पहिल्यांदा परीक्षा दिल्यानंतर मी मुख्याधिकारी पदासाठी परीक्षा उत्तीर्ण झालो तर दुसऱ्यावेळी पोलीस उपअधीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालो.

आयुष्यात गुरू म्हणून आई 

सर्वांच्याच आयुष्यात गुरू म्हणून आईची भूमिका खूप महत्त्वाची असते. तसेच आयुष्यात माझा सर्वात महत्वाचा गुरू म्हणजे आई आहे. आजही तिच्या शिकवणुकीवरच माझे कर्तव्य सुरू असते. कुठल्या प्रकरणात तडजोड असो की न्याय देण्याची भूमिका असो यात आईची शिकवणच मला खूप प्रेरणा देते, असे उद्गार काढताना भावनिक झाले होते. यावेळी पोलीस अधीक्षक मगर यांनी त्यांचे पहिले गुरू श्री. कुलकर्णी, श्री. तोडमल, श्री वळू आणि आई- वडिल यांना अभिवादन करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com