Nanded: माहूर नगरपंचायत सदस्यपदाची आरक्षण सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहूर नगरपंचायत

माहूर नगरपंचायत सदस्यपदाची आरक्षण सोडत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माहूर : राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील माहे डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १७, मुदत समाप्त झालेल्या २ व ७ नवनिर्मित अशा २६ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्या पैकी नांदेड जिल्ह्यातील माहूर नगरपंचायतचे सदस्य पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१२) रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षाच्या शहरातील व तालुक्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवाराचे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात तर नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांचे आरक्षण चिमुकल्या मुलांच्या हाताने चिठ्ठ्या टाकून सोडत पद्धतीने काढण्यात आले.

आरक्षण सोडत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्तीकिरण पुजार हे होते तर त्यांना सहायक म्हणून तहसीलदार तथा मुख्याधिकारी राकेश अण्णासाहेब गिड्डे, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, नायब तहसीलदार व्ही.टी. गोविंदवार यांच्यासह नगर पंचायत व तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

आरक्षण सोडत कार्यक्रमाला राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षाचे प्रतिनिधींची उपस्थिती होती. यात प्रामुख्याने काँग्रेस पक्षाकडून प्रा. राजेंद्र केशवे, भाजपकडून ॲड. रमण जायभाये, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून किशोर पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मेघराज जाधव, शिवसेनेकडून शहर प्रमुख निरधारी जाधव, एमआयएमकडून शेख अजीज भाई आणि सय्यद सिराज व प्रहार जनशक्ती पक्षाकडून सुभाष दवणे आणि अमजद पठाण यांच्यासह इतर पक्ष, आघाड्यांचे व तसेच अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची उपस्थिती होती.

शांततेत पार पडलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमात मातब्बर राजकिय मंडळीचे आरक्षण बदलामुळे वर्चस्व असलेल्या प्रभागात निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले असून मागील वर्षभरापासून बाशिंग बांधून अमक्या प्रभागातून मीच निवडणूक लढविणार असल्याचे चंग बांधलेल्यांचे मनसुबे आरक्षण बदलामुळे उधळले आहे.

माहूर नगर पंचायतचे १७ प्रभागसाठीचे जाहीर आरक्षण

अनुसूचित जाती : प्रभाग क्रमांक १७ (महिला) १६ (खुला)

अनुसूचित जमाती : प्रभाग क्रमांक ५ (महिला)

नागरिकांचा मागास प्रवर्ग : प्रभाग क्रमांक ३ (खुला), ८(खुला)

नागरीकांचा मागास प्रवर्ग : (महिला) प्रभाग क्रमांक ६,९,१२

सर्वसाधारण महिला : २, ४, १०, १४

उर्वरित जागा सर्वसाधारण : १, ११, १३, १५, १७

loading image
go to top