नांदेड : लिंबोटी धरणाचे १४ दरवाजे उघडले

प्रल्हाद कांबळे
Sunday, 20 September 2020

लोहा तालुक्यात असलेल्या या धरणाने धक्याची पातळी ओलांडली आहे. शनिवारी भल्या पहाटे व रात्री दहा वाजेपर्यंत एकूण नऊ दरवाजे उघडण्यात आले होते. ते पुन्हा सर्व दरवाजे बंद करून सलग दुसऱ्या दिवशी दोन वेळा धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला.

नांदेड : उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरणाचे शनिवारी (ता. १९) भल्या पहाटे पाच दरवाजे उघडण्यात आले तर रात्री आठच्या सुमारास नऊ दरवाजे दोन तासासाठी उघडण्यात आले होते. उघडलेल्या दरवाजातून सकाळी  मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मन्याड नदीत सोडण्यात आला. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

लोहा तालुक्यात असलेल्या या धरणाने धक्याची पातळी ओलांडली आहे. शनिवारी भल्या पहाटे व रात्री दहा वाजेपर्यंत एकूण नऊ दरवाजे उघडण्यात आले होते. ते पुन्हा सर्व दरवाजे बंद करून सलग दुसऱ्या दिवशी दोन वेळा धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. ता. १९ सप्टेंबर रोजी शनिवारी भल्या पहाटे धरणाचे पाच वक्रद्वार ५० सेंटिमीटरने उघडण्यात आले होते. त्यातून मानार नदीपात्रात २३६. २६ क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला. तर रात्री आठ वाजता नऊ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ४२५. २७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती शाखा अभियंता श्री. कोळेकर आणि कनिष्ठ अभियंता एस. एम. बोधले यांनी दिली.

हेही वाचा सिध्देश्वर धरणाचे सहा गेट उघडले -

धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस झाला

नदीकाठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवसात दोन वेळा दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात अहमदपूर व धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस झाला. त्यामुळे शनिवारी पुन्हा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नऊ दरवाजे उचलण्यात आले. एकाच दिवसात दोनदा एकूण १४ दरवाजे उघडण्यात आले. तहसीलदार विठ्ठल परळीकर हे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

यांचे आहे परिस्थितीवर लक्ष

पूरस्थिती निर्माण झाल्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधितांना तहसीलदार यांनी दिल्या आहेत. या प्रकल्पाच्या जलसाठा नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जे. कुरेकर, शाखा अभियंता कोळेकर, कनिष्ठ अभियंता एस. एम. बोधले, सहाय्यक अभियंता अशोक कदम हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: 14 gates of Limboti dam opened nanded news