नांदेड - गुरुवारी कोरोना प्रतिबंधक ‘लसी’चे १७ हजार डोस उपलब्ध होणार 

शिवचरण वावळे
Wednesday, 13 January 2021

पहिल्या टप्यात एक हजार सातशे वाईल्स मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी बुधवारी (ता. १३) दिली

नांदेड - कोरोना आजाराला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली आहे. नांदेड जिल्ह्यास गुरुवारी (ता. १४) दिवसभरात ही लस उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्यात एक हजार सातशे वाईल्स मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी बुधवारी (ता. १३) दिली. 

एका वाईल्समध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दहा डोस असतात. त्यामुळे जिल्ह्यासाठी मिळणारी डोसची संख्या १७ हजार इतकी असल्याचे सांगण्यात आले. लस उपलब्ध होताच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या शितगृहात ठेवण्यात येणार आहे. 

हेही वाचा- अर्धापुरात दोघांची गळफास घेवून आत्महत्या,तर दिव्यांगाचा कालव्यात पडून मृत्यू ​

दिवसाला शंभर किंवा त्या पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस 

त्यानंतर ही लस जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालय, हदगाव, मुगट आणि नांदेड शहरातील हैदरबाग येथील शासकीय रुग्णालय अशा सहा सेंटरवर पाठविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शासनाच्या संकेत स्थळावर नोंद झालेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक डोस दिला जाणार आहे. दिवसाला शंभर किंवा त्या पेक्षा जास्त लाभार्थ्यांना देखील ही लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

हेही वाचा- नांदेड बसस्थानकातून सव्वा तीन लाखाचे दागिने चोरले ​

या सहा ठिकाणी मिळणार लस 

- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी. 
- श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय 
- देगलूर नाका येथील हैदरबाद रुग्णालय 
- मुखेड उपजिल्हा रुग्णालय 
- हदगाव शासकीय रुग्णालय 
- मुगट शासकीय रुग्णालय 

लसिकरण केंद्राबाहेर खबरदारी घेतली जाणार
कोरोना प्रतिबंधात्मक लस ज्या सेंटरवर उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन लाभार्थ्यास लस दिली जाणार आहे. रसिकरण केंद्राबाहेर गर्दी होणार नाही. याची देखील प्रशासन खबरदारी घेणार आहे. 
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: 17,000 Doses of corona vaccine will be available on Thursday Nanded News