
वाहतूक दरात 50 टक्के सूट, इतर ठिकाणाहून सुद्धा शेतकरी आणि व्यापारी यांना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड : ता.11 फेब्रुवारीला नांदेड रेल्वे विभागाला मोठी उपलब्धता मिळाली. ता. पाच जानेवारी रोजी सुरु केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला. फक्त 38 दिवसात 50 किसान रेल्वेने नगरसोल येथून देशाच्या विविध भागात 19 हजार 318 टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास 9. 29 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. किसान रेल्वेने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात 50 टक्के सूट देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणाहून ही किसान रेल्वे सुरु करण्याकरिता संबधित अधिकारी प्रयत्नरत आहेत. या 50 टक्के सूटचा इतर ठिकाणातील शेतकरी मित्रांनी, व्यापार्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.
कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करुन देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरु केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्सप्रेस ता. पाच जानेवारी, 2021 ला नगरसोल येथून सोडण्यात आली. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला, फातुहा आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत चालविण्यात आलेल्या 50 किसान रेल्वेमधून देशाच्या विविध भागात 19 हजार 318 टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास 9. 29 कोटी (नऊ कोटी एकोणतीस लाख रुपये ) चा महसूल मिळाला आहे. नांदेड विभागातून या वर्षी मार्च महिन्याअखेरीस आणखी 50 किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ठ आहे. ता. 11 फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणाकरिता आणखी 90 किसान रेल्वेची मागणी नोंदविण्यात आली आहे.
किसान रेल्वेचे वैशिठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात, साधारण 50 किलोमीटर प्रती घंटा या वेगाने धावतात, यामुळे शेती माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल" च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी 50 टक्के दर सवलत देण्यात आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातुन यशस्वीपणे किसान रेल सुरु करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला. श्री माल्या यांनी शेतकरी आणि व्यापारी यांना आवाहन केले आहे की किसान विशेष रेल्वे करिता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरुन आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच नांदेड विभागातून मालवाहतूक वाढवण्यात हातभार लावावा.