नांदेडमध्ये दुर्दैवी घटना : पित्यापाठोपाठ कन्येने सोडले प्राण

प्रल्हाद कांबळे
Monday, 28 September 2020

डॉ. प्र. दि. पुरंदरे यांचे शनिवारी निधन झाल्यानंतर त्यांची तृतीय कन्या मंजिरी यांची तब्येत सायंकाळी बिघडली. त्यांना शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नांदेड : शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाग्यनगरमधील रहिवासी मंजिरी प्रभाकरराव पुरंदरे यांचे ता. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विशेष म्हणजे वडिल डॉ. प्र. दि. पुरंदरे यांचे ता. २६ सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर चोवीस तासातच कन्येनेही प्राण सोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. प्र. दि. पुरंदरे यांचे शनिवारी निधन झाल्यानंतर त्यांची तृतीय कन्या मंजिरी यांची तब्येत सायंकाळी बिघडली. त्यांना शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी (ता.२७) सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ५५ वर्षांच्या होत्या.

हेही वाचा वाहून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारास वाचविण्यात यश

जुना मोंढा रामघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

त्यांनी आपले जीवन संघ परिवाराच्या कार्याला समर्पित केले होते. त्यांच्या पश्चात बहीण सौ.अंजली, सौ.नीता, सौ.अरुंधती, भाऊजी कुंदन कोंडो, अशोक भागवत, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण साले,  भाचे, भाची असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी सात वाजता जुना मोंढा रामघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांचे निधन होऊन चोवीस तास उलटले नाही. तोच कन्येनेही प्राण सोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

येथे क्लिक करा - आमदारांनी मागविली बैलगाडी अन् त्यात बसून जिल्हाधिकारी मुगळीकरांची पाहणी  

विविध पदावर होत्या कार्यरत

मंजिरी पुरंदरे या संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या. पुरंदरे कुटुंबच संघ परिवाराला समर्पित असल्याने तोच वसा घेत मंजिरी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नांदेड शहर मंत्री, विश्व हिंदू परिषदेच्या महिला आघाडी शहर प्रमुख, पीपल्स हायस्कूल शालेय समिती अध्यक्ष, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या, श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढीच्या कार्यवाहक, संस्कार भारती, राष्ट्र सेविका समितीच्या स्वयंसेविका म्हणूनही त्यांनी विविध पदांवर कार्य केले होते. विद्यार्थी दशेपासून त्यांनी विविध आंदोलनातही हिरीरीने भाग घेतला होता.सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक,शैक्षणिक कार्यातही त्या सक्रिय होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: After the father, the daughter gave up her life nanded news