नांदेड : `ती' रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकांकडून वसूल करावी- शिक्षणाधिकारी

प्रभाकर लखपत्रेवार
Saturday, 17 October 2020

त्यांनी नियुक्त केलेले स्वयंपाकी व मदतनीस यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात येत असून. त्यांना प्रदान करण्यात आलेले मानधन शाळेच्या मुख्याध्यापकांकडून वसूल करण्यात यावे

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : सांगवी (ता. नायगाव) येथील कै. नारायणराव पाटील माध्यमिक विद्यालयातील शालेय पोषण आहार समिती नियमबाह्य आहे. त्यांनी नियुक्त केलेले स्वयंपाकी व मदतनीस यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात येत असून. त्यांना प्रदान करण्यात आलेले मानधन शाळेच्या मुख्याध्यापकांकडून वसूल करण्यात यावे असे आदेश जि. प. च्या शिक्षणाधिकाऱ्यांनी नायगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

नायगाव तालुक्यातील सांगवी येथील कै. नारायणराव पाटील माध्यमिक विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेत अनियमितता झाली असल्याची तक्रार संस्थेचे अध्यक्ष भगवान पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केली होती. त्यामुळे शाळेला देण्यात येणारा पोषण आहार स्थगित करण्यात आला व शालेय पोषण आहार योजनेच्या लेखाधिकारी यांनी सदर प्रकरणी चौकशी करुन स्वयंस्पष्ट अभिप्राय नमूद करुन काय कारवाई करता येईल असा अहवाल सादर करण्याच्या सुचना शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिल्या होत्या.

हेही वाचा -  हिंगोली : जिल्हा परिषदेत झिरो पेंडसीसाठी धावपळ, त्रिस्तरीय समितीमार्फत होणार तपासणी

शाळेने नियमबाह्य पद्धतीने शालेय पोषण आहार

लेखाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात शाळेत मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे संनियंत्रण करण्यासाठी नियमानुसार शालेय व्यवस्थापन समिती गठीत केली नसल्याचा ठपका ठेवला असून. गटशिक्षणाधिकारी नायगाव यांचा चौकशी अहवाल व दाखल केलेल्या अभिलेख्यावरुन शाळेने नियमबाह्य पद्धतीने शालेय पोषण आहार समिती गठीत केल्याचे आढळून आले आहे. ही बाब नियमसुसंगत नाही त्यामुळे समिती बरखास्त करण्याचीही शिफारस केली होती. 

त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येते

शालेय पोषण आहार योजनेच्या लेखाधिकारी यांनी सदर केलेल्या अहवालानुसार माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी (ता. १३) रोजी नायगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून. सांगवी येथील कै. नारायणराव पाटील माध्यमिक विद्यालयातील शालेय पोषण आहार समिती नियमबाह्य असल्यामुळे त्यांच्या द्वारे नेमणूक केलेले स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्तीही नियमबाह्य आहे. त्यामुळे  त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येते व त्यांना नियुक्तीपासून शासनाकडून प्रदान करण्यात आलेले मानधन शाळेच्या मुख्याध्यापकांकडून वसूल करण्यात यावेत व तसा अहवाल पाठवण्यात यावा असे आदेश दिले आहेत.

त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी

दरम्यान सदर प्रकरणी शासनाने प्रदान केलेली रक्कम वसूल न करता मुख्याध्यापकांनी बोगस शालेय पोषण आहार समिती गठीत करून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष भगवान पवार यांनी मुख कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: The amount should be recovered from the school headmaster - Education Officer nanded news

Tags
टॉपिकस
Topic Tags: