नांदेड : दिव्यांग मुलीच्या खूनप्रकरणी आरोपींना अटक करा- बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती

प्रल्हाद कांबळे
Friday, 11 December 2020

बिलोली शहरातील मुकबधीर दिव्यांग मुलीवर अत्याचार करुन हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या अन्यथा दोन दिवसांत संपूर्ण जिल्हाभरात कॅन्डल मार्च काढत आंदोलन करणार.

नांदेड : नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना ही नांदेड जिल्ह्यातील बिलोली या शहरात ता. 9 डिसेंबर रोजी घडली आहे. निसर्गाने दिव्यांगत्व आलेल्या बिलोली येथील मुकबधीर दिव्यांग मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करुन तीची निर्घृणपणे हत्या केली आहे. याच्याच निषेधार्थ कमल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेडकडुन ता. 10 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सदरील ही घटना नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी असुन आम्ही सर्व दिव्यांग या घटनेचा जाहिर निषेध करतो. तसेच या घटनेला जिल्हा प्रशासन व राज्य सरकारसुद्धा जबाबदार आहेत. कारण दिव्यांग सुधारीत कायदा 2016 आणि त्या कायद्यातील सर्व कलमे ही आजही कागदावरच आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नसल्यामुळेच दिव्यांगांवर असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. 

हेही वाचा -  नांदेड : हवेतील कार्बन कमी करुन हमखास उत्पादन देणाऱ्या बांबूची लागवड करावी- पाशा पटेल

जोवर अशा घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा होणार नाही. तोवर यावर आळा बसणार नाही. त्यामुळे तत्काळ नराधमांना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा दोन दिवसांत संपूर्ण जिल्हाभरात कॅन्डल मार्च काढत आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर राहुल साळवेसह, अमरदिप गोधने, प्रदिप हणवते, नागनाथ कामजळगे, कार्तिक भरतीपुरम, सय्यद आरीफ, राजु ईराबत्तीन, संजय सोनुले, मनोहर पंडित, प्रशांत हणमंते, नागेश निरडी, विश्वनाथ सातोरे आणि गणेश मंदा ईल्लया यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Arrest the accused in the murder case of Divyang girl - Unemployed Divyang Kalyanakruti Sangharsh Samiti nanded news