
Water for Birds : दोन थेंब पाण्यासाठी पक्ष्यांची लाहीलाही; पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याची गरज
नांदेड - ‘आकाशी झेप घेरे पाखरा...’ असे म्हणताच पक्ष्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. मात्र, याच पक्ष्यांना कडक उन्हाळ्याचा फटका बसतोय, पक्ष्यांसाठी आता रेड अलर्ट सुरु झाला आहे. म्हणून प्रत्येकाने पक्ष्यांसाठी आपआपल्या परीने पाणी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
यंदा सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत होत्या. तरीही उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईचे चटके आतापासून जाणवू लागले आहेत. काही गावात आठ दिवसांआड तर कुठे चार दिवसाआड नळाला पाणी येऊ लागले आहे.
त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. यात सजीवांसह पक्षी, प्राणीही सुटले नाहीत. शासनस्तरावर उन्हाळ्यात पाणवठे निर्माण केले जातात. मात्र, ते पाणवठेच कोरडेठाक पडतात, असे चित्र आजवर बघायला मिळाले आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
आधुनिकतेचा फटका पक्ष्यांना
ओझोन वायुचा थर दिवसेंदिवस कमी होत चालल्याने तापमानात वाढ होत आहे. किरण, नेटवर्किंगमुळे पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आज संगणक युगात पक्ष्यांचे महत्त्व पिंजऱ्यात कैद असल्याचे
वास्तव निर्माण झाले आहे. अनेकांच्या घरात पोपट, लव्ह बर्डसारखे पक्षी पिंजऱ्यात कैद ठेवले जात आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींमधून होत आहे.
पक्ष्यांसाठी पुढे येण्याची गरज
वृक्ष, पशू व पक्ष्यांचे महत्त्व जाणून निसर्गाशी नाते जोडण्याचा संदेश संत तुकाराम महाराज यांनी ‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’’ या अभंगातून मानवाला दिला आहे. मात्र, मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने नैसर्गिक समतोल बिघडला आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली असून, वन्यप्राण्यांसह पशुपक्षी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. त्यांच्या तृष्णातृप्तीसाठी नागरिकांनी आपल्या घराबाहेर, छतावर, संरक्षण भिंतीवर, भिंती तथा वृक्षांवर मातीच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी ठेवणे गरजेचे आहे.
पक्ष्यांनाही जीव आहे. त्यांच्या संवेदना जाणून घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था राष्ट्रीय कर्तव्य समजून बजावल्यास पक्ष्यांच्या जीवाचे रक्षण करता येईल. तेव्हा प्रत्येकानेच या कार्यात पुढाकार घेवून राष्ट्रीय संपत्ती जोपासण्यासाठी माणुसकीचा वाटा उचलावा.
- हनुमंतराव मनीयार, पक्षीप्रेमी, नांदेड.