डिजिटल शिक्षण मुलांच्या भविष्यासाठी नवनवे प्रयोग प्रभावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

Nanded News : डिजिटल शिक्षण मुलांच्या भविष्यासाठी नवनवे प्रयोग प्रभावी

नांदेड : ग्रामीण भागातील मुलांच्या उज्वल भविष्य घडविण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. त्यासाठी शिक्षकातील नवनवे प्रयोग प्रभावी ठरू शकतात. शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. महिला म्हणून आपण सर्व जबाबदाऱ्या पार पडतो.

परंतु स्वतःकडे, आरोग्याकडे, योग्य आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित डिजिटल एज्युकेशन फॉर वुमेन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी (नियोजन) गौशिया वडजकर, दिलीप बनसोडे, बंडू आमदूरकर, शिक्षिका उषा हाळे व सुनीता मोगडपल्ले होते.

सीईओ ठाकूर म्हणाल्या की, डिजिटल युगात महिला शिक्षकांनी ज्ञानार्जनाचे काम करताना विविध विषयात स्मार्ट असणे आवश्यक आहे. वाडी-तांड्यावर विद्यार्थ्यांना शिकवताना अनेक आव्हाने व अडचणी आहेत परंतु त्या अडचणीवर मात करून विद्यार्थी व पालकांमध्ये कौशल्याची छाप पाडणारीच माझी शिक्षिका पुढे जाऊ शकते असे, त्यांनी सांगितले.

संतोष केंद्रे दिग्दर्शित बदल या लघु चित्रपटाच्या पोस्टरचे विमोचन व अनिता दाने यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.बासरी वादक ऐनोद्दीन वारसी व त्यांच्या संचांच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले. प्रास्ताविक डॉ. सविता बिरगे व दिग्रसकर यांनी केले. सूत्रसंचालन पांडागळे व सुचिता खल्लाळ यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये उत्तुंग भरारी घेण्याची ताकद असते. एक महिला शिक्षिका म्हणून त्यांच्या भरारीला बळ देण्याचे काम करावे. डीएड झाल्यानंतर आपण शिक्षक म्हणून नोकरीला लागलात परंतु शिक्षकांनी पुढे शिकले पाहिजे.

जितके तुम्ही शिक्षण घ्याल तितके तुम्ही उत्तम शिकवाल. उद्या शाळेत शिकवण्याचा पाठ घरी दोन-तीन वेळा वाचून बघावा. त्यानंतर तुमचे अध्ययन, अध्यापन, विद्यार्थी लक्ष देऊन ऐकतील. तुमचे विद्यार्थी इंजिनियर व्हावेत, डॉक्टर व्हावेत, कलेक्टर व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत.

- डाॅ. गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक.