
Nanded News : स्वयंशिक्षण प्रयोगाची यशस्वी वाटचाल
लोहा : ग्राम विकासातील शाश्वत पाया म्हणजे स्त्रियांचे सबलीकरण आणि शेतकऱ्यांचा जागतिक बाजारपेठेशी जोडून आव्हानांना भिडण्याचा ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ आहे. हा प्रयोग कंधार- लोह्यात १३० गावांमध्ये राबवला जातो. लहान शेतकऱ्यांना विशेषतः महिलांना मदतीसाठी योग्य संस्थापक आराखडा तयार होतो आहे.
ही मोठी बदलाची गोष्ट आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित लघु उद्योगाची कास धरत ग्रामीण भागातील महिला आणि अल्पभूधारक शेतकरी सक्षम होण्यासाठी हा चांगला उद्यमी मार्ग आहे. सखी अन्नसुरक्षा शेती या प्रकल्पातून लोहा तालुक्यातील ८० तर कंधार तालुक्यातील ५० गावांची निवड करण्यात आली.
गावातील अल्पशिक्षित महिलांमध्ये आरोग्याच्या समस्या आहेत. पुरुषांमध्ये व्यसनाधीनता आहे, आर्थिक बळकटीकरण नाही, शेती तोट्यात आहे, हाताला उद्योग धंदा नाही. त्यामुळे व्यसनाधीनता वाढली. या सगळ्या समस्याला तोंड देण्यासाठी स्वयं शिक्षण प्रयोग मदतीला आला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये कुपोषित असलेल्या स्त्रियांसाठी एक प्रकल्प चालवला गेला.
त्यामध्ये सोनखेड क्षेत्रातील ३० गावांची निवड केली. तीव्र कुपोषित असलेल्या महिलांमध्ये पोषण मिळावे म्हणून स्थानिक पातळीवर परसबागा तयार केल्या. यासाठी तीन हजार महिलांशी संपर्क ठेवण्यात आला. बामणी, जानापुरी, निळा या गावात अनिमिया या आजाराने त्रस्त असलेल्या महिला मोठ्या संख्येने दिसून आल्या.यापूर्वी या भागात ‘दुष्काळ हटवून माणूस जगवू’ याचाही प्रयोग पुणे येथील अनिल शिदोरे यांनी केला होता.
लोहा तालुक्यातील भेंडेगाव, बामणी, दगडगाव, कोल्हे बोरगाव, निळा, मडकी, हरबळ, हरसद, झरी, वडेपुरी, दापशेड, सोनखेड अशा गावातून लघुउद्योग तयार होत आहेत. हे सर्व सोपस्कार करण्यासाठी तालुकास्तरावर कृषी विभाग आणि आर्थिक सहाय्य देण्यात येणाऱ्या बँका मदतीसाठी पुढे येत नव्हत्या.
‘सखी अन्न सुरक्षा शेती शिबिर’ घेऊन कृषी विभाग आणि संबंधित आर्थिक सहाय्य करणाऱ्या बँकांना निमंत्रित करण्यात आले. त्यामुळे हा मार्ग सोपा झाला असल्याचे सांगण्यात आले.
लोकांच्या जगण्याचा मार्ग बिकट झालेला होता. तो स्वावलंबनावर आधारित असावा. ग्रामीण भागात एकमेकांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आर्थिक सक्षमीकरण करणे गरजेचे होते. ते आधी महिलांचे आजार आणि पुरुषांची व्यसनाधीनता यावर भर देण्यात आला.
विना जाधव, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक
महिलांच्या हाताला काम असेल तर ती कुटुंब आर्थिक सक्षमीकरणात येते. त्यासाठी प्रेमासखी फार्मर प्रोडूसर कंपनीच्या मार्फत हळद प्रक्रिया, आंबा लोणचे, मिरची, मसाले पावडर हे उद्योग हाती घेतले. त्यामुळे आर्थिक सुरक्षा, अन्नसुरक्षा गणित सहज साध्य झाले.
रेवती कानगुले, तालुका समन्वयक