Nanded Breaking : आज पुन्हा सहा पॉझिटिव्ह, संख्या गेली ५१ वर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये ठाणे येथील एक पुरुष, पंजाबमधील एक महिला व एक पुरुष तसेच यूपीमधील तीन महिलांचा समावेश आहे. 

नांदेड : शहरात सलग दुसऱ्यादिवशी कोरोना बाधित रुग्ण सहा आढळल्याने आता रुग्णांची संख्या ५१ वर गेली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.  

शनिवारी दिवसभरामध्ये सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (ता.१०) पुन्हा सहा रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नांदेडकरांसह जिल्हा प्रशासनाची चिंता आता अधिकच वाढली आहे. रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये ठाणे येथील एक पुरुष, पंजाबमधील एक महिला व एक पुरुष तसेच यूपीमधील तीन महिलांचा समावेश आहे. 

हेही वाचा - नांदेड महापालिकेत आता ‘यांच्या’ आरोग्याकडे द्यावे लागणार लक्ष

रविवारी एकूण ८९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ८२ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आलेला आहे.  तर सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१ वर गेली असून, त्यात पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.  नांदेडकरांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. तसेच मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. 

जिल्ह्यातील एकूण ५१ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११ रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी, पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्रीनिवास कोविड केअर सेंटर येथे ३२ तर माहूर कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णावर औषधोपचार सुरू आहेत. उपचार सुरु असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

हे देखील वाचाच - नातेवाईकाला भेटण्यासाठी आले अन् ‘कोरोना’ पॉझिटिव्ह निघाले...

आतापर्यंत ९६ हजार १४७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १९६० रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. १५७१ जणांचे स्वॅब नमुने अहवाल निगेटिव्ह आले असून ३७ अहवाल प्रलंबित आहेत.  ५१ कोरोना बाधित रुग्णांपैकी औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. रक्तदाब, मधुमेह या आजाराने हे पाचही रुग्ण त्रस्त होते. त्यामुळे रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Breaking : Today Again Six Positive, The Number Has Gone Up To 51