
कोरोनाविरुद्धच्या लढाईत नांदेड महापालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी, कामगार आपआपल्या परीने काम करत आहेत. मात्र, ते करत असताना त्यांना लागणारे मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, पायमोजे व इतर साहित्य आणि सुविधांचीही गरज आहे.
नांदेड - कोरोनाविरुद्धच्या लढाईत नांदेड महापालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी, कामगार आपआपल्या परीने काम करत आहेत. मात्र, ते करत असताना त्यांना लागणारे मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, पायमोजे व इतर साहित्य आणि सुविधांचीही गरज आहे. मात्र, त्याची संख्या कमी असल्याने अपुऱ्या साधनाद्वारे काम करावे लागत असल्याने आता महापालिकेला त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. याबाबत महापालिकेतील काही अधिकारी, कामगार आणि कर्मचाऱ्यांनीही चिंता व्यक्त करत भीती वाटत असल्याचे सांगितले आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर पहिल्या लॉकडाउनमध्ये २१ दिवसात एकही रुग्ण आढळून आला नाही. नंतर दुसऱ्या लॉकडाउनमध्ये रुग्ण आढळून आला. तो संपेपर्यंत रुग्णांची संख्या वाढत चालली होती. आता तिसऱ्या लॉकडाउनमध्ये असून त्यामध्ये कोरोनारुग्णांचा आकडा आता रविवारपर्यंत (ता. दहा) ४५ वर गेला आहे तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - विजेच्या कडाकडाटाने उडाली झोप, कुठे ते वाचा...
सुरक्षित साहित्याचा अभाव
कोरोनाच्या विरुद्धची लढाई जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागासह महापालिकाही लढत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित साहित्याचा अभाव असल्याने अडचणी येत आहेत. महापालिकेचे अधिकारी, कर्माचारी, कामगार आपआपले कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अत्यावश्यक असलेले दर्जेदार मास्क, हातमोजे, पायमोजे, सॅनिटायझर आदी साहित्यांची गरज आहे. त्याची वाणवा असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.
पुरेसे साहित्य देण्याची गरज
कोरोनाचा संंसर्ग टाळण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे साहित्य उपलब्ध नाही. काही दिवसापूर्वी महापालिकेने अधिकारी, कर्मचारी व कामगारांसाठी कपड्यापासून बनवलेले मास्कचे वाटप केले. तर काही ठिकाणी सॅनिटायझर आणि हातमोजे वाटले. मात्र, अजूनही काहींना साहित्य मिळाले नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे कोरोनाच्या सावटाखाली काम करत असताना या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावत असताना मदतीची गरज आहे. आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यांनी लक्ष देऊन मदतीचा हात पुढे केला पाहिजे.
हेही वाचले पाहिजे - उद्योजकाने घरातच बांधली रेशीमगाठ...
कुटुंबियांकडून चिंता व्यक्त
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आपआपल्या परीने आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, त्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांनीही उपस्थित केला आहे. ज्यांचे वय ५५ वर्षाच्या वर आहे आणि जे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत तसेच ज्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजार आहेत. त्यांच्याबाबतीत आयुक्तांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे आणि त्यांना सवलत द्यावी, अशी मागणी देखील कुटुंबियांनी केली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या कामाच्या बाबतीतही नियोजन करुन काम देण्यात यावे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.