नांदेड : कृषी विधेयकाची ‘स्वाभिमानी’कडून होळी 

प्रल्हाद कांबळे
Friday, 25 September 2020

कृषी विधेयकावर लोकसभेत पुरेशी चर्चा केली नाही. भविष्यातील कृषी क्षेत्रातील धोक्यांचा विचार विनिमय न करताच हे बिल पास करण्यात आले आहे. तसेच या बिलात हमीभावाविषयी कुठेही वाच्यता करण्यात आली नाही.

नांदेड : नांदेडमध्ये शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी उत्पादन व्यापार, वाणिज्य कायद्याला विधेयकाला विरोध करत शुक्रवारी (ता. २५) कृषी विधेयकाची होळी केली. 

कृषी विधेयकावर लोकसभेत पुरेशी चर्चा केली नाही. भविष्यातील कृषी क्षेत्रातील धोक्यांचा विचार विनिमय न करताच हे बिल पास करण्यात आले आहे. तसेच या बिलात हमीभावाविषयी कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. केंद्र सरकार आता इतर क्षेत्राबरोबर शेती क्षेत्रालाही अडाणी आणि अंबानी यांच्या दावणीला बांधायला निघायली आहे असा आरोप यावेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी केला. यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष मारोती भांगे, ज्येष्ठ नेते किसनराव कदम, मधुकरराव राजेगोरे, नेमाजी पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा - पैनगंगेच्या पुरामुळे अनेकांची शेती पाण्याखाली; पिकांचे नुकसान

रास्ता रोको करण्याचा तयारीत असणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक

मालेगाव : केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्त्वात मालेगाव येथील शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु पोलीस प्रशासनाने शेकाप कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच अटक केल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली.

अटक करुन प्रतिबंधात्मक कारवाई करुन सोडण्यात आले

केंद्रातील कायदे हे शेतकरी आणि कामगार विरोधी आहेत. देशातल्या शेतकऱ्यांना आणि कामगारांना देशोधडीला लावणारे आहेत. जर कायदे रद्द केले नाही तर पोलिसांमार्फत केंद्राने किती ही ताकद लावली तरी शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. या पुढे भगतसिंग यांच्या मार्गाने आंदोलन करून सरकारला झुकाऊ असा इशारा देण्यात आला. यावेळी विद्याधर तारु, मनोज शेळके, श्रीकांत कांबळे यांच्यासह आदींना अटक करुन प्रतिबंधात्मक कारवाई करुन सोडण्यात आले. 

येथे क्लिक करा नांदेड : पत्नीचा खून करून पतीकडून आत्महत्येचा प्रयत्न

इस्लापुर येथे मुंडन आंदोलन करत केली कायद्याची होळी

नांदेड : केंद्र सरकारने सरकारने काढलेल्या या अध्यादेशात शेती व शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या हवाली करण्याचा डाव आहे. बाजार समित्या उध्वस्त करून, हमी भावाचे संरक्षण काढून घेऊन शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी हे षडयंत्र आखले गेले आहे. असे मत कॉ. अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.

मुंडन आंदोलन करुन केंद्र शासनाचा निषेध

शेतकरी संघटनेचे दिलेल्या भारत बंद आंदोलनाला प्रतिसाद देत किनवट तालुक्यात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर केलेला घातक हल्ला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने व किसान युनियनने तीन अध्यादेशा विरोधात आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मुंडन आंदोलन करुन केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. यामुळे किनवट तालुक्यात किनवट, इस्लापुर, शिवणी, तोटंबा, मानंसिंग नाईक तांडा,चंद्रुनाईक तांडा, मार्लागोंडा, तल्हारी, बुरकलवाडी, परोटी, नागापुर, नंदगाव, कोसमेट, दुर्गानगर इत्यादी गावात आंदोलने करुन कायद्याच्या प्रतीचे दहन करण्यात आले. अध्यादेश शेतकरीविरोधी असुन काळे कायदे परत घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. अर्जुन आडे, कॉ. खंडेराव कानडे, स्टॅलिन आडे, प्रभाकर बोड्डेवार, आनंद लव्हाळे, प्रकाश बोड्डेवार, प्रकाश वानखेडे, कॉ. अजय चव्हाण, प्रकाश ढेरे, अंबर चव्हाण, देविदास राठोड, मांगीलाल राठोड, मनोहर आडे, शिवाजी किरवले, विठ्ठल पंधलवाड, रंगराव चव्हाण आदिनी केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: burned of Agriculture Bill from 'Swabhimani' nanded news