esakal | नांदेड : बिनविरोध निवडणूक झाल्यास गाव दत्तक घेणार- आ. राजेश पवार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गावच्या हितासाठी हा निर्णय चांगला असला तरी राजकीय महत्वाकांक्षा असलेले गाव पुढारी आमदाराच्या कल्पनेला कितपत दाद देतात हे येणाऱ्या काळात दिसेल. 

नांदेड : बिनविरोध निवडणूक झाल्यास गाव दत्तक घेणार- आ. राजेश पवार

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव (जिल्हा नांदेड) : गुलाबी थंडीत गावचे राजकारण तापत असतांना या भागाचे आमदार राजेश पवार यांनी ज्या गावची निवडणूक बिनविरोध होईल त्या गावात विकासाच्या योजना राबवण्यासाठी 'दत्तक गाव योजना' राबवण्याची अभिनव कल्पना समाजमाध्यमातून मांडली आहे. गावच्या हितासाठी हा निर्णय चांगला असला तरी राजकीय महत्वाकांक्षा असलेले गाव पुढारी आमदाराच्या कल्पनेला कितपत दाद देतात हे येणाऱ्या काळात दिसेल. 

मागच्या पाच वर्षात १४ व्या वित्त आयोगाने गावचा विकास कमी केला असला तरी गाव कारभाऱ्यांचा विकास चांगला झाला आहे. आता १५ वा वित्त आयोग आला असल्याने गावच्या विधानसभेच्या चाव्या आपल्याकडे असाव्यात यासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावच्या कारभाऱ्यांची झालेली भरभराट पाहून गाव आपल्या ताब्यात राहीले पाहीजे यासाठी इच्छूकांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे सध्या गावचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. नायगाव तालुक्यातील काही मोठी गावे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत अशा गावात जोरदार रस्सीखेच आहे तर दुसरीकडे उपसरपंच होवून कारभारी होण्याचे वेध अनेकांना लागले आहेत. 

हेही वाचा - नांदेड : वाईबाजारमध्ये मोबाइल नेटवर्क प्रॉब्लेम सुटता सुटेना, फोरजीच्या पॅकेजमध्ये टुजीही मिळेना -

सध्या तरुणाईला ग्रामपंचायतच्या राजकारणाचे वेध लागले असल्याने ग्रामीण भागात राजकीय ज्वर चढला आहे. त्यामुळे बघूयात कोण आपल्यापुढे टिकते अशा डरकाळ्या फोडल्या जात आहेत. अती उत्साही आणि शिघ्रकोपी लोकामुळे गावचे सौहार्द बिघडू नये यासाठी अनेकजण प्रयत्न करतच असतात. अनेक राजकीय नेते गावच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणा करतात मात्र नायगावचे आमदार राजेश पवार यांनी अभिनव कल्पना मांडली असून 'गाव दत्तक योजना' राबवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. 

मागच्या दोन तीन दिवसापासून आ. राजेश पवार यांचे एक बँनर समाजमाध्यमातून तसे  फिरत आहे. त्यावर गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यास त्या गावचा 'दत्तक गाव योजनेत' समावेश करण्यात येणार असून. गावचा विकास करण्यासाठी विषेश प्राधान्य देण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. त्यात अंतर्गत रस्ते, स्मशानभूमीसाठी गायरान जागा, स्मशानभूमीसाठी शेड बांधण्यासाठी प्रयत्न, सरकारी योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम, पांदन रस्ते व आरोग्य मेळावे घेण्याची अभिनव संकल्पना मांडली आहे. एखाद्या कामासाठी केवळ निधी देण्याऐवजी गावच्या विकासासाठी आणि गावात सौहार्दपूर्ण वातावरण रहावे यासाठी आ. पवार यांनी वेगळी संकल्पना मांडली आहे. 

आ. पवार यांनी मांडलेल्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे विकासप्रेमी नागरिकांनी स्वागत केले असून गाव सुधारण्याच्या द्रष्टीने हा उपक्रम स्तुत्य असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र सध्या वाढलेली राजकीय महत्वाकांक्षा त्यातच गटातटाचे सुरु झालेले राजकारण पाहता आमदारांच्या गाव सुधारणेच्या संकल्पनेला किती प्रतीसाद मिळतो ते येणाऱ्या काळात दिसणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image