नांदेड : थंडी कमी झाल्याने रब्बी पिकावर परिणाम

प्रल्हाद कांबळे
Monday, 30 November 2020


जिल्ह्यात दरवर्षी दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. सिंचनाची सोय असलेल्या भागात तसेच जमिनीतील ओलाव्यावर पिके घेतली जातात. रब्बीच्या काळात नैसर्गीक आपत्तीची शक्यता खरिपाच्या तुलनेत कमी असते.

नांदेड  : खरीपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. मागील काही दिववापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा सुरुवातीपासूनच थंडी कमी - अधिक होत असल्याने रब्बी पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. सिंचनाची सोय असलेल्या भागात तसेच जमिनीतील ओलाव्यावर पिके घेतली जातात. रब्बीच्या काळात नैसर्गीक आपत्तीची शक्यता खरिपाच्या तुलनेत कमी असते. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील उत्पादनाची खात्री असते. परंतु यंदा म्हणावी तशी थंडी पडली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला होता. यानंतर मात्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमानाचा पारा २१ अंश सेल्सिअसपर्यंत वर गेला.

नांदेड जिल्हा तेलंगणा सिमेलगत असल्यामुळे दक्षीण भारतात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याला जाणवतो. अशावेळी राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेडमध्ये पावसाचे सावट असते. सोमवारी (ता. ३०) जिल्ह्याचे कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आगामी काही दिवसही ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे हरभरा, गहू, करडी, रब्बी ज्वारी या पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे जाणवत आहे.

हेही वाचा -  नांदेडकरांसाठी गुड न्यूज : रक्त पिशवीच्या दराबाबत आता दर निश्चित -

एक लाख हेक्टवर पेरणी

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख हेक्टरच्यावर रब्बी पेरणी झाली आहे. यात सर्वाधीक हरभरा पेरला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ३६ हजार हेक्टर आहे. यात मागील काही काळात वाढ होत आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा तसेच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पातील पाणी पाळ्या मिळत असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार ६४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यात सार्वधीक एक लाख ९० हजार हेक्टरवर हरभराची पेरणी झाली होती. तर चाळीस हजार हेक्टरवर गहू व ३४ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती. यंदा यात कृषी विभागाकडून वाढ व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात तीन लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Cold snap affects rabi crop nanded news