नांदेड : माळेगाव यात्रेवर कोरोना, आचारसंहितेचे सावट, निर्णय लवकरच

प्रल्हाद कांबळे
Thursday, 17 December 2020

माळेगाव (तालुका लोहा) येथील श्री खंडोबाची यात्रा दरवर्षी लाखो भाविक भक्त सहभागी होतात. यात्रेचे नियोजन जिल्हा परिषदेकडून केले जाते. यात्रेत भरणारा बाजार देशभरात प्रसिद्ध आहे.

नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेवर यंदा कोरोना व ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट आहे. शासनाच्या सूचना आणि निर्देशानुसार सदर यात्रा भरता येणार अथवा कसे याबाबत संदिग्धता निर्माण झाली असून अंतिम निर्णय घेण्यासाठी लवकरच जिल्हा परिषदेमध्ये बैठक आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

माळेगाव (तालुका लोहा) येथील श्री खंडोबाची यात्रा दरवर्षी लाखो भाविक भक्त सहभागी होतात. यात्रेचे नियोजन जिल्हा परिषदेकडून केले जाते. यात्रेत भरणारा बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. विविध प्राण्याची येथे मोठी खरेदी- विक्री होते. किमान महिनाभरापासून यात्रेच्या नियोजनाची लगबग सुरु असते. तसेच देशभरातील व्यापारीसुद्धा माळेगावच्या दिशेने कूच करीत असतात. मात्र यंदा माळेगाव यात्रेवर ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट आले आहे. त्यामुळे यात्रा दरवर्षी प्रमाणे या वर्षीही तितक्याच उत्साहाने भरली जाईल अथवा कसे याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

हेही वाचा नांदेड : ग्रामीण भागातून गोबरगॅस नामशेष -

शासनाने अनेक ठिकाणच्या यात्रेस परवानगी नाकारल्याचे उदाहरणे या सर्व पार्श्वभूमीवर माळेगाव यात्रेच्या अनुषंगाने काय निर्णय घेतला जातो याकडे भाविक भक्तांचे लक्ष लागले आहे. सोशल डिस्टंसिंग करुन मालेगाव येथील श्री. खंडोबाची यात्रा भरली जावी असे भाविकांना वाटणे सहाजिकच असली तरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेचे प्रशासन तसेच पदाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे. देश भरातून भाविकांची गर्दी आणि त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. ता. 11 जानेवारीपासून माळेगाव यात्रा श्रीक्षेत्र श्री खंडोबा राया ची यात्रा आहे. दरवर्षी 15 दिवस यात्रा भरते असे असले तरी पुढील किमान पंधरा दिवस विविध साहित्य, वस्तू विक्री करणारे व्यापारी या ठिकाणी तळ ठोकून असतात.याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Corona on Malegaon Yatra, breach of code of conduct, decision soon nanded news