नांदेड : लाचखोर ग्रामविस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे
Friday, 25 September 2020

माहूर तालुक्यातील वाईबाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून तक्रारदारास सार्वजनीक वाचनालयासाठी नाहरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता आहे. त्यामुळे तक्रारदार हा ग्रामपंचायत कार्यालयात गेला.

नांदेड : ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजाराची लाच स्विकारणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई वाई बाजार (ता. माहूर) येथे शुक्रवारी (ता. २५) करण्यात आली. लाचखोर ग्रामविस्तार अधिकाऱ्याविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

माहूर तालुक्यातील वाईबाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून तक्रारदारास सार्वजनीक वाचनालयासाठी नाहरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता आहे. त्यामुळे तक्रारदार हा ग्रामपंचायत कार्यालयात गेला. आपले सर्व कागदपत्रासह फाईल दाखल केली. आणि नाहरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी शंकर राजेन्ना गुंडमवार (वय ५३) यानेया कामासाठी तक्रारदारास १० हजाराची लाच मागितली. तडजोअंती ही लाच दोन टप्यात देण्याचे ठरले. 

हेही वाचा  सोयाबीन शेंगामधील बियाण्यांची उगवण समस्या व उपायाबाबत कृषि सल्ला -

पाच हजार रुपये घेताना रंगेहात पकडले

मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने गुरुवारी (ता. २४) नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांनी आपले सहकारी अधिकारी पोलिस निरीक्षक कपील शेळके यांच्या पथकाला पडताळणी सापळा लावण्यास सांगितले. या पथकाने पडताळणी सापळा लावला. शुक्रवारी (ता. २५) ग्रामपंचायत कार्यालयात लाचखोर ग्रामविस्तार अधिकारी शंकर गुंडमवार याला पाच हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. पोलिस निरिक्षक कपील शेळके यांच्या फिर्यादीवरुन माहूर पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

येथे क्लिक करा - नांदेड : कृषी विधेयकाची ‘स्वाभिमानी’कडून होळी -

या सापळा कारवाईसाठी यांचे परिश्रम

पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कपील शेळके, कर्मचारी जगन्नाथ अनंतवार, गणेश केजकर, विलास राठोड, नरेंद्र बोडके यांनी सहभाग घेतला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Corrupt village extension officer in ACB's trap nanded news