नांदेड : मंगरूळ येथील सीआरपीएफचे अधिकारी पोचिराम सुद्देवाड यांचा जम्मू काश्मिरात मृत्यू

प्रकाश जैन
Wednesday, 2 September 2020

केंद्रीय राखीव दलातील पोचिराम सुद्देवाड यांचे जम्मू  काश्मीर मध्ये शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवार (ता. एक) निधन झाले. 

हिमायतनगर (जिल्हा नांदेड)  : तालुक्यातील मंगरूळ येथिल रहिवासी तथा जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले केंद्रीय राखीव दलातील पोचिराम सुद्देवाड यांचे जम्मू  काश्मीरमध्ये शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवार (ता. एक) निधन झाले. त्यांच्यावर मंगरूळ येथे शासकीय इतमामात बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

मंगरूळ  ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील पोचिराम गंगाराम सुद्देवाड हे गेल्या 20 वर्षापासून देश्याच्या विविध भागात केंद्रीय पोलिस दलात सेवा बजावत होते. आजघडीला अत्यंत संवेदनशील असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये देश सेवा बजावत होते. याच दरम्यान पोचिराम सुद्देवाड हे आजारी पडल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचार घेत असता मंगळवार ता. एक सप्टेंबर रोजी अचानक तब्येत खालावल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

हेही वाचा - नांदेड : परभणीतून फरार झालेल्या कैद्याला भोकर पोलिसांकडून अटक -

अंत्यविधीसाठी ग्रामस्थाकडून विशेष तयारी

त्यांचे प्रेत जम्मू काश्मीर येथून सेनादलाच्या विशेष विमानाने हैद्राबाद येथे आणण्यात येणार असून बुधवारी (ता. दोन) सायंकाळी उशिरापर्यंत प्रेत केंद्रीय पोलिस दलाच्या वाहनाने मंगरूळ येथे आणण्यात येणार आहे  राञी उशीरा अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थाकडून विशेष तयारी केली आहे. त्यांच्या पश्चात आई  पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार असून देश्याची सेवा करतांना तालुक्याचा एक भुमीपुञ गेल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: CRPF officer Pochiram Suddewad from Mangrul dies in Jammu and Kashmir nanded news