पथदिव्याच्या थकबाकीमुळे नांदेड अंधारात; महावितरणची कारवाई

नांदेड महापालिका
नांदेड महापालिका
Updated on

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेने पथदिवे आणि पाणीपुरवठ्याची ४५ कोटी रुपयांची थकबाकी भरली नसल्यामुळे महावितरण विभागातर्फे शहरातील काही पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. महापालिकेने दीड कोटी रुपये भरले असले तरी अद्याप पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे सोमवारी (ता. १५) शहरातील वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे नांदेड शहर अंधारातच होते. 

'मार्च एन्ड'च्या पार्श्वभुमीवर महावितरण कंपनीने नांदेड वाघाळा महापालिकेच्या विरोधात वीज थकबाकी वसूल करण्यासाठी कारवाई सुरु केली आहे. महापालिकेकडे महावितरणची वीजपुरवठ्यापोटी पथदिव्यांची दहा कोटी रुपयांची थकबाकी असल्याने शहरातील ६४२ पैकी जवळपास ५० टक्के कनेक्शन महावितरणने बंद केल्यामुळे शहरात अंधार झाला आहे. दरम्यान, महापालिकेने दीड कोटी रुपये भरले. तरीही सोमवारी (ता. १५) सायंकाळपर्यंत महावितरणने वीजपुरवठा पुर्ववत केला नाही.

हेही वाचा - परभणी जिल्हाधिकारी व आयुक्तांकडूनच नागरीकांना गुलाबपुष्प; विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात गांधीगीरी
 
महापालिकेकडे ४५ कोटींची थकबाकी

मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने मोहिम सुरु केली आहे. दरम्यान, महापालिकेकडेच वीज पुरवठापोटी पथदिव्यांची दहा कोटी आणि पाणीपुरवठ्याची ३५ कोटी अशी एकूण ४५ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे शहरातील ६४२ पैकी ५० टक्के पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद केला. गल्लीबोळातील पथदिवे सुरू आहेत. मात्र, मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. दर महिन्याला महापालिकेला पथदिव्यापोटी ४० लाख रुपये वीज बिल येते तर, पाणीपुरवठ्यासाठी एक कोटी २० लाख रुपये बिल येते. २०१५ पासून महापालिकेची आर्थिक परिस्थिती डगमगल्याने थकबाकी वाढत राहिली. 

पालकमंत्र्यांनी घेतली बैठक
यापूर्वी पाणी पुरवठ्यासाठी चार कोटी व पथदिव्यांचे दोन कोटी रुपये भरले आहेत. दरम्यान मागील थकबाकी आणि चालू मागणी व त्यावरील शास्ती अशी एकूण ४५ कोटी रुपये भरावेत, असे महावितरणचे म्हणणे असल्याची माहिती महापालिकेचे उपअभियंता सतिश ढवळे यांनी दिली आहे. दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी नियोजन भवन येथे बैठक घेतली होती. त्यात या संदर्भात महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्पुरते दोन कोटी रुपये भरा, अशा सुचना महापालिकेला दिल्या. त्यानुसार दीड कोटी रुपये महापालिकेने महावितरणकडे भरले. तरीही रात्रीपर्यंत पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता. दरम्यान, महापालिकेकडे पथदिवे आणि पाणीपुरवठ्याची ५८ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com