नांदेडला कॉँग्रेसच्या व्हर्च्युअल रॅलीत शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी

अभय कुळकजाईकर
Thursday, 15 October 2020

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने गुरूवारी राज्यात संगमनेर, उमरेड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पालघर या ठिकाणाहून एकाच वेळी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना संबोधीत केले. या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रेक्षपण आभासी सभेच्या माध्यमातून नांदेड येथे करण्यात आले.

नांदेड - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने गुरूवारी (ता. १५) राज्यातील विविध ठिकाणी शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे थेट प्रेक्षपण येथील नांदेडमध्ये भक्ती लॉन्समध्ये करण्यात आले होते. या व्हर्च्युअल रॅलीस जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली.

राज्यात संगमनेर, उमरेड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पालघर या ठिकाणाहून एकाच वेळी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना संबोधीत केले. या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रेक्षपण आभासी सभेच्या माध्यमातून नांदेड येथे करण्यात आले. राज्यभरात विविध ठिकाणी घेतलेल्या सभांमध्ये राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा - वृत्तपत्र विक्रेता दिन : शेडसाठी मनपाकडून २५ लाख मंजूर- आ. राजूरकर

स्थानिक नेत्यांनी केले संबोधित
नांदेड येथे विविध ठिकाणच्या सभा सुरु होण्यापूर्वी स्थानिक नेत्यांनी उपस्थितांना संबोधीत केले. यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद व महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार वसंत चव्हाण, हणमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी विजय येवनकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सरिता बिरकले, उपसभापती जोत्स्ना गोडबोले यांची उपस्थिती होती.

सावंत, राजूरकरांची झाली भाषणे
माजी पालकमंत्री डी. पी. सावंत म्हणाले की, ब्रिटिशांच्या काळात एखादा कायदा जनविरोधी झाला तर जनतेच्या रेट्यापुढे तो रद्द केला जात असे. परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या काळात एक नव्हे तर अनेक जनविरोधी कायदे केले जात आहेत. परंतु जनतेच्या भावनांची कदर न करता हे काळे कायदे रेटून नेण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. आमदार राजूरकर म्हणाले की, देशाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधामध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. हे काळे कायदे रद्द केल्याशिवाय काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. 

हेही वाचलेच पाहिजे - ह्रदयद्रावक घटना : दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू

बाजार समित्या संपविण्याचा घाट
माजी आमदार वसंत चव्हाण म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या संपविण्याचा सरकारने घाट घातला आहे. शेतकऱ्यांचे राज्य संपवून आदानी आणि अंबानी यांच्या हाती देशाची आर्थिक सत्ता देण्याचे हे षडयंत्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या आभासी सभेचे सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले. जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी आभार मानले. या व्हर्च्युअल सभेस काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded demands repeal of anti-farmer black laws at Congress virtual rally, Nanded news