नांदेड :मी पुन्हा येणार म्हणू नका... सोशल माध्यमातून भावी सरपंचाना दिला जातोय सल्ला..

लक्ष्मीकांत मुळे
Saturday, 2 January 2021

ही वेळ गावच्या सरपंच पदांचे स्वप्न पाहणा-या गावपुढा-यांवर येवू नये त्यांनी सतर्क रहावे यासाठी मी पुन्हा येणार असे म्हणु नका, असा सल्ला सोशल माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच सरपंचपदाचे महत्त्व जबाबदारी, उमेदवार कसे निवडून द्यावेत, निवडणूक पाच वर्षात एकदा येते. आपले रोजचे संबंध टिकले पाहिजे असे एक ना अनेक सल्ले देण्यात येत आहेत.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीच्या पुर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे ठामपणे सांगितले होते. युतीला बहुमत मिळालेही. पण युतीमधील सेनेला फोडून शरद पवारांनी महाविकास आघाडीची सत्ता आणून उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले.

राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळी आली आहे. ही वेळ गावच्या सरपंच पदांचे स्वप्न पाहणा-या गावपुढा-यांवर येवू नये त्यांनी सतर्क रहावे यासाठी मी पुन्हा येणार असे म्हणु नका, असा सल्ला सोशल माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच सरपंचपदाचे महत्त्व जबाबदारी, उमेदवार कसे निवडून द्यावेत, निवडणूक पाच वर्षात एकदा येते. आपले रोजचे संबंध टिकले पाहिजे असे एक ना अनेक सल्ले देण्यात येत आहेत.

हेही वाचाअभिनव उपक्रम : दिव्यांगांनी पोलिस प्रशासन आणि पत्रकारांचे केले स्वागत. मिठाई, तिळगुळासह दिले गुलाब पुष्प -

गावातील सरपंचपद हे जसे मानाचे तसेच जबाबदारीचे असते. सरपंचांना एकाचवेळी अनेक भूमिका व जबाबदा-या पार पाडाव्या लागतात. हे पद केव्हा हुलकावणी देईल हे सांगता येत नसल्यामुळे बहुमत असूनसुद्धा सरपंचपद जावू शकते हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. प्रत्येक गावात काही बेरकी मानसंअसतात. ते आकड्यांची जूळवा जुळव करुन विरोधी पक्षाला धोबी पछाड देवून राजकीय चित्र बदलू शकतात. त्यामुळे आत्तापासूनच सतर्क राहण्यासाठी सल्ला देण्यात येत आहे.

ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाची पायरी. सरपंचानी मनात आणले व त्यांना सदस्यांनी साथ दिल्याने काय होवू शकते हे राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा येथील गावचा विकास पाहून कळते. या गावचा आदर्श घ्या, सरपंचपदी चांगल्या व्यक्तीला निवडून द्यावे, एका चुकीच्या निर्णयामुळे पाच वर्षे गावचा विकासावर परिणाम होईल असे सल्ले देण्यात येत आहेत.

येथे क्लिक करानांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण -

निवडणुकीत व सरपंच पदाच्या निवडीत प्रत्येक मताला महत्व असते. एका मताने चित्र बदलू शकते. ऐनवेळी सरपंचपदाचा उमेदवार, सदस्य फुटू शकतो. याकडे सोशल माध्यमातून सल्ला देत आहेत. तसेच प्रत्येक गावात शरद पवार, संजय राऊत यांच्यासारखे गेम चेंजर असतात ते केंव्हाही बाजी पलटून मोठ्या पक्षाला, गटाला विरोधी पक्षात बसवू शकतात तेव्हा सावध रहा, मी पुन्हा येणार म्हणून नका...

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Don't say I will come again ... Advice is being given to future Sarpanch through social media nanded news