Nanded Farmer : जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना पावणेचारशे कोटींचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

Nanded Farmer : जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना पावणेचारशे कोटींचे वाटप

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शासनाच्या भरपाईचे वाटप सुरु आहे. जिल्हा बँकेला प्राप्त झालेल्या ६९१ कोटी १५ लाखांपेकी अडीच लाख शेतकऱ्यांना एटीएम व शाखेतून ३७५ कोटी ३० लाख रुपयांचे वाटप झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपसरव्यवस्थापक मारोतराव शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात यंदा जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली होती. यामुळे जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मुग या पाच लाख २७ हजार १४१ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ६६ हेक्टरवरिल फळपिके असे एकूण पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधीक नुकसान झाले होते. यात सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांना फटका बसला. या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्ह्याला ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार सहाशे रुपयांचा निधी ता.२१ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. यानंतर हा निधी लगेच सर्वच सोळा तालुक्यांना वितरीत करुन शेतकऱ्यांच्या याद्यानुसार जिल्हा बँकेला वितरीत केला होता.

यानंतर जिल्हा बँकेकडून जमा खर्च झाल्यानंतर शेतकऱ्यांना वाटप करण्याचे काम सुरु झाले. जिल्हा बँकेला सात लाख २६ हजार ६१२ खातेदार शेतकऱ्यांसाठी ६९१ कोटी १५ लाख रुपये प्राप्त झाले होते. यातील दोन लाख ६२ हजार ३४० शेतकऱ्यांना बँकेमार्फत २६९ कोटी ७९ लाख सात हजार रुपये वाटप झाले आहेत. तर एटीएमच्या माध्यमातून एक लाख ९४ हजार ५१० खातेदारांनी १०५ कोटी ५१ लाख ३१ हजार असे एकूण ३७५ कोटी ३० लाख ३८ हजार रुपये वाटप झाले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना लवकर रक्कम मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आजपर्यंत पावणेचारशे कोटी रुपये वितरीत झाले आहेत. उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांना वेळेवर मिळेल याचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे.

- मारोतराव शिंदे, उपसरव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नांदेड