नांदेड : कृषीपंपाच्या थकित विजबीलाच्या व्याजाखाली दबतोय शेतकरी

लक्ष्मीकांत मुळे
Thursday, 26 November 2020

प्रत्येक पक्ष विजबील माफीचा घोषणा करतो, दरवेळी आश्वासन मिळते. या आश्वासनच्या मृगजळाच्या पाठीमागे लागल्याने थकीत बिलाचा आकडा व्याजासह लाखांच्यावर कधी गेला हे कळतच नाही. थकबाकीत विजबीलाला लावण्यात येणारे व्याज व मुळ विजबीलाच्या पन्नास टक्के माफी मिळाली तर काही प्रमाणात विजबील वसूल होवू शकते अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : कृषीपंप जोडणीच्या बीलाच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. थकीत विजबीलाला विज वितरण कंपनी 18 टक्के व्याज व दोन टक्के विलंब आकार असे मिळून शेतकऱ्याला विस टक्के व्याज भरावे लागले. असे व्याज कोणतीच बॅंक थकीत कर्जाला लावत नाही. या  चक्रवाढ व्याजामुळे थकबाकीचा आकडा वाढत आहे. शेतकऱ्याला तीनमाही विजबीलाइतकेच व्याज भरावे लागत आहे. 

प्रत्येक पक्ष विजबील माफीचा घोषणा करतो, दरवेळी आश्वासन मिळते. या आश्वासनच्या मृगजळाच्या पाठीमागे लागल्याने थकीत बिलाचा आकडा व्याजासह लाखांच्यावर कधी गेला हे कळतच नाही. थकबाकीत विजबीलाला लावण्यात येणारे व्याज व मुळ विजबीलाच्या पन्नास टक्के माफी मिळाली तर काही प्रमाणात विजबील वसूल होवू शकते अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे. कृषीपंपाला 24 तास विजपुरवठा करणे हा एक इतिहास झाला आहे. भारनियमनामुळे शेतक-यांना रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. या वन्यपशुचा धोका तसेच विजेचा धक्का लागून शेतक-यांचे मृत्यूच्या घटना झाल्या आहेत.

हेही वाचा नांदेड : अंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, भोकरच्या एसबीआय बॅंक समोरिल प्रकार -

कृषीपंपला आश्वशक्ती निहाय विजबील करण्यात येते. हे विजबील दर तिन महिन्याला भरावे लागते. तीन आश्वशक्तीसाठी साडेतीन हजार, पाच आश्वशक्ती साठी सात हजार, दहा आश्वशक्तीसाठी सोळा हजार असा तीमाही आकार आहे. नापीकी, दुष्काळ, शेतीचे कमी उत्पन्न, शेतीमालाला मिळालेला कमी भाव या ईतर कारनामुळे विजबील भरणे शक्य होत नाही त्यामुळे धकबाकी वाढतच जाते. 

अर्धापूर येथे एका शेतक-याला थकित बील आले आहे. बीलाची रक्कम एक लाख 22 हजार आहे. या रकमेत 46 हजार 278 थकीत व्याजीची रक्कम आहे. तर चालू बील तीन हजार 870, वहन आकार दोन हजार 175  आहे. तसेच तीन महिण्याचे व्याज दोन हजार 620 आहे. तर निव्वळ थकबाकी आहे 69 हजार 615 आहे.

शेतकरी वारंवार आर्थिक संकटात येतो. विजबील भरणे राहून जाते. त्यामुळे थकबाकीत सातत्याने वाढ होते व व्याजाची रक्कम भरावी लागते. शेतक-याना दिलासा देण्यासाठी थकीतबीलावरचे पुर्ण व्याज माफ करुन मुळ बील 50 टक्के माफ व राहिलेले बील दोन टप्प्यांत भरुन घेतल्यास शेतक-यांना फायदा होवू शकतो अशी प्रतिक्रिया श्रावण सिनगारे यांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Farmers are squeezing under the interest of tired electricity bills of agricultural pumps nanded news