नांदेड : भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी नाही- अनिल घनवट

file photo
file photo

नांदेड - दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ता. 8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही. नवीन कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होइल. शेतकऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या फायद्याचे असले, तरी देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. सरकारने या आंदोलनाच्या दबावामुळे नवीन कृषी सुधारणा कायदे मागे घेतले, तर पुढील पन्नास वर्षे तरी कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचे धाडस करणार नही.

आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समित्या व एम.एस.पी. सुरु राहणार आहे, मग आता आंदोलन सुरु ठेवण्याचे कारण नाही. कायदेच रद्द करा ही मागणी अत्यंत चुकीची आहे. ज्या व्यवस्थेने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले तीच व्यवस्था सुरू रहावी, असा आंदोलकांचा आग्रह आहे.

शेतकऱ्यांना पुन्हा बाजार समितीतच माल विकण्याची सक्ती होणार आहे. लायसनदार आडत्यांची मनमानी सहन करावी लागणार आहे. कंत्राटी शेतीमुळे मालाचे भाव निश्चित होतील व दराची हमी मिळेल. मल्टी नॅशनल कंपन्यांची भीती दाखवली जात आहे, पण या सुधारणांमुळे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभे राहून रोजगार निर्मिती होणार आहे.

नवीन कायदे रद्द करण्यापेक्षा त्यात दुरुस्ती होणे आवश्यक आहे. आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळला आहे, पण भाववाढ झाल्यास पुन्हा आवश्यक कायदा लागू करण्याची तरतूद असल्यामुळे कांदा निर्यात बंदी, कडधान्याच्या व पामतेलाच्या आयातीसारखे शेतीमालाचे भाव पाडण्याचे निर्णय होतात. शेतीमाल कायमचा आवश्यक वस्तू कायद्यातून वगळावा. शेतीमाल व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमचा बंद व्हावा. नवीन कायद्यातील न्याय निवाड्याची जवाबदारी महसूल खात्याकडे न देता त्यासाठी एक ट्रिब्युनल स्थापन करावे या सुधारणा नवीन कायद्यात होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना व्यापार स्वातंत्र्य देणारे हे कायदे केंद्र सरकारने रद्द केल्यास याचा देशातील राजकारणावर अनिष्ट प्रभाव पडेल व येणाऱ्या काळात कोणत्याही पक्षाचे सरकार शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याचे धाडस करणार नाही. ज्या समाजवादी व्यवस्थेत शेतकऱ्याचा माल स्वस्तात लुटण्याची व्यवस्था आहे, तीच व्यावस्था कायम राहील व शेतकरी फाशी घेत राहतील.

दिल्लीत शेतकऱ्यांनी एकजुटीची ताकद दाखवून सरकारला वाकवले हे कौतुकास्पद आहे. एम.एस.पी.चे संरक्षण सदासर्वकाळ राहू शकत नाही व व्यापार स्वातंत्र्य हे पंजाब हरियाणाच्या सुपीक जमिनीतील शेतकऱ्यांना जास्त फायद्याचे ठरू शकते हे त्यांनी समजून घ्यावे. आता सरकार कायदे दुरुस्त करण्यास तयार झाले आहे, तर आंदोलन थांबवून चर्चेतून प्रश्न सोडवावा व कायदे रद्द करण्याचा हट्ट सोडावा, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्त केले आहे.

तसेच 12 डिसेंबरच्या नांदेड येथील शेतकरी मेळव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे नांदेड जिल्हा शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, जिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, स्व.भा.प. जिल्हाप्रमुख ऍड. धोंडीबा पवार, आर. पी. कदम, व्यंकटराव वडजे, रामराव पा. कोंढेकर, किशनराव पाटील, विठ्ठल जाधव, शिवराज पाटील, प्रल्हाद पाटील, त्रिभुवन ठाकूर, भीमराव शिंदे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com