नांदेड : सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करा- शैलेश कामत

प्रल्हाद कांबळे
Friday, 19 February 2021

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज पार पडला,

नांदेड : सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करुन रस्ते अपघातातील जखमींना मदत करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज पार पडला, यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. कामत बोलत होते.  

याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभियानानिमित्त विद्यार्थी व नागरिकांसाठी आयोजित केलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण यावेळी करण्यात आले.

जिल्ह्यातील रस्ते अपघात व अपघातील मृत्यू कमी करण्याच्या उद्दिष्टाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ता. 18 जानेवारी ते ता. 17 फेब्रुवारी याकाळात सायकल रॅली, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, पथनाट्य, चित्ररथाद्वारे जनजागृती कार्यक्रम, प्रबोधन शिबिरे अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या अभियानात जिल्ह्यातील मोटर ड्रायव्हिंग स्कूल वाहन वितरक पीयूसी सेंटर फकीरा सेवाभावी संस्था विविध संघटना व संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांपैकी काहींनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली येंबरवार व जयश्री वाघमारे यांनी केले तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश गाजूलवाड, नंदकिशोर कुंडगीर, श्रीमती भलगे तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Follow the traffic rules for safe transportation Shailesh Kamat nanded news