esakal | नांदेड : हाथरस घटनेचा विसर, महिलां अत्याचार विरोधात भाजपचा ‘आक्रोश’
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सोमवारी (ता. १२) ऑक्टोबर रोजी महात्मा फुले पुतळा येथे ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी दिली.

नांदेड : हाथरस घटनेचा विसर, महिलां अत्याचार विरोधात भाजपचा ‘आक्रोश’

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. बलात्कार, विनयभंग, हत्याकांडाचे सत्र सुरुच असून राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (ता. १२) ऑक्टोबर रोजी महात्मा फुले पुतळा येथे ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी दिली. मात्र देशभर गाजत असलेल्या हाथरसच्या घटनेचा विसर, स्थानिक भाजपला झाल्याचे त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रावरुन दिसुन येते. 
 
महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पीटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरुच आहे. जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी गोरे यांचा खुन, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, इंजलकरंजी येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये मुलीचा विनयभंग, चंद्रपुर येथे १६ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार, उस्मानाबाद शहराजवळील राघुचीवाडी येथे अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून अत्याचार अशा अनेक निंदनीय घटना घडल्या असतांना महाविकास आघाडी सरकार मात्र महिलांच्या सुरक्षिततेबाबत निष्क्रीयता दाखवत आहे.

हेही वाचानांदेड जिल्ह्यात विवाहिता छळाच्या घटनांमध्ये होतेय वाढ -

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी ‘आक्रोश’

त्यामुळे निष्क्रीय सरकारच्या विरोधात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी ‘आक्रोश’ आंदोलन छेडण्यात येणार आहे. याच अनुषंगाने शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या आंदोलनात भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजप मोर्चा जिल्हाध्यक्ष मिनल खतगावकर, डॉ. शितल भालके, श्रद्धा चव्हाण, महादेवी मठपती, विजय गंभीरे, प्रभु कपाटे, मनोज जाधव, अभिलाष नाईक, कुणाल गजभारे, हरभजनसिंघ, सूर्यकांत कदम आदींची उपस्थिती राहणार असून महाविकास आघाडी सरकाराच्या विरोधात असलेल्या या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मिनल खतगावकर यांनी केले आहे.